पंतप्रधान परतताच सुशोभीकरणाची चकाकी फिकी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान परतताच सुशोभीकरणाची चकाकी फिकी!
पंतप्रधान परतताच सुशोभीकरणाची चकाकी फिकी!

पंतप्रधान परतताच सुशोभीकरणाची चकाकी फिकी!

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ : पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ते भेट देणारा सर्व परिसर सुशोभीकरण करून चकचकीत करण्यात आला होता. त्यासाठी चक्क १५ कोटींचा खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात येते; परंतु मोदी माघारी फिरताच सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. परिणामी तीन दिवस चकाकणारा परिसर आता बकाल दिसू लागला आहे.

पंतप्रधानांच्या मरोळ दौऱ्यासाठी पालिकेने सुशोभीकरणाची कामे करून सर्व परिसर रातोरात चकचकीत केला होता. त्यासाठी साधारण १५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. मात्र, पंतप्रधान परतताच सर्व चकाकी ओसरल्याचे दिसत आहे. मरोळमधील चर्चरोडचा काही भाग अहोरात्र काम करून सुशोभित करण्यात आला होता. त्या परिसरातील काही ठिकाणी लावण्यात आलेली शोभेची झाडे पाणी न मिळाल्याने मरणपंथाला लागली आहेत. पदपथावर ठेवलेल्या सर्व फुलांच्या आणि शोभेच्या कुंड्या के पूर्व प्रभाग कार्यालयाने काढून नेल्या आहेत. त्यामुळे काही परिसर रिकामा दिसत आहे. भिंतींवर रंगवण्यात आलेल्या काही ग्राफिटी आणि म्युरल्सची दुरवस्था होत आहे.

पंतप्रधानांच्या दौऱ्याआधी संबंधित परिसर अवैध पार्किंगपासून मुक्त करण्यात आला होता. सध्या मात्र तिथे सर्रास बेकायदा पार्किंग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. परिसरातील झाडांचे बुंधे सिमेंट किंवा डेब्रिजपासून मुक्त होते. सध्या मात्र अनेक झाडांच्या बुंध्यात सिमेंट आणि डेब्रिज टाकल्याचे दिसत आहे.

आयुक्तांकडे कारवाईची मागणी
सुशोभीकरणानंतरच्या दुरवस्थेबाबत के पूर्व प्रभाग अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले असता त्यांनी मात्र त्याची गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे स्वतः आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी त्यांच्याकडे केली आहे.
........