
कोरोनानंतर नागरिकांचे विम्याला प्राधान्य
मुंबई, ता. १५ : कोरोनामध्ये निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे भारतीय नागरिक आपल्या उत्पन्नाचा उपयोग गुंतवणुकीच्या माध्यमातून आर्थिक संरक्षण उभारण्यासाठी करत आहेत. त्यामुळे विमा पॉलिसी घेताना निव्वळ संरक्षण देणारी उत्पादने खरेदी करण्याकडे जास्त लोकांचा कल आहे, असे एजिस फेडरल लाइफ इन्शुरन्सच्या सर्वेक्षणात दिसून आले आहे.
एजिस फेडरलने युगोव्ह इंडियाच्या साह्याने हे सर्वेक्षण केले. जीवन विम्याबद्दल भारतीय ग्राहकांचा दृष्टिकोन, आणि विमा खरेदी मागील विचार आणि मूल्यमापन हे या सर्वेक्षणाद्वारे जाणून घेण्यात आले. निव्वळ संरक्षण देणारी उत्पादने खरेदी करण्याकडे ६८ टक्के लोकांचा कल आहे. गेल्या वर्षभरात ४९ टक्के लोकांमध्ये टर्म योजना सर्वात लोकप्रिय झाली. त्यानंतर मनीबॅक पॉलिसीला २८ टक्के लोकांची पसंती होती, असेही आढळले.
जीवनातील अनिश्चिततांपासून आर्थिक संरक्षण मिळवण्यासाठी जीवन विमा महत्त्वाचा असल्याचे लोकांना कोरोनानंतर कळले आहे. त्यामुळे कुटुंबात अकाली मृत्यू झाल्यास आर्थिक संरक्षण मिळण्यासाठी ६५ टक्के लोक विमा खरेदी करतात. तर भविष्यात मुलांचे शिक्षण, विवाह हे देखील मध्यमवयीन व्यक्तींचे (३६ ते ४५ वय) विमा खरेदी करण्याचे महत्त्वाचे कारण असल्याचे दिसून आले. गुंतवणुकीवरील करसवलत हा जीवन विमा खरेदी करण्याच्या कारणांमधील सर्वात कमी महत्त्वाचे कारण आहे. तरुण वयोगटातील व्यक्ती सुरक्षित परताव्याचे साधन म्हणून जीवन विम्याकडे पाहतात. ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे लोक निवृत्ती पश्चात लाभ मिळण्यासाठी विमा खरेदी करत असल्याची माहिती एजिस फेडरलचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रामन यांनी दिली.
--------
ॅऑनलाईन माध्यमांतून खरेदी
पूर्वी लोक विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी एजंट व स्वतंत्र आर्थिक सल्लागारांवर अवलंबून असत, पण कोरोनानंतर डिजिटायझेशन मोठ्या प्रमाणावर झाल्याने ग्राहक वेबसाईट किंवा मोबाईल ॲप माध्यमांचाही विचार करतात, असल्याची माहिती एजिस फेडरलचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक रामन यांनी दिली.