
बदाम खाल्ल्याने मधुमेहाचा धोका कमी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या भारतीयांमध्ये बदाम खाल्ल्यानंतर स्वादुपिंडाचे कार्य, इन्सुलिन प्रतिरोधकता, रक्तातील साखर आणि वजन यामध्ये सुधारणा झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. सलग १२ आठवडे बदाम खाल्ल्याने इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी होते. स्वादुपिंडाचे कार्य सुधारते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. त्याचबरोबर रोज बदाम खाणाऱ्या गटाने या कालावधीत शरीराचे वजन, बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) आणि कंबरेच्या घेरात लक्षणीय घट करून एकूण कोलेस्ट्रॉलही कमी केले.
मद्रास डायबेटिस रिसर्च फाउंडेशन मधुमेह संशोधनाचे अध्यक्ष विश्वनाथन मोहन यांनी या अभ्यासाचे नेतृत्व केले. फाऊंडेशनच्या उपाध्यक्ष आर. एम. अंजना, प्राध्यापक रिचर्ड मॅट्स, प्रा. जॉर्डी सालास, प्रा. वॉल्टर विलेट यांनी या अभ्यासात सहभाग घेतला होता. या संशोधकांनी १२ आठवडे दररोज ४३ ग्रॅम (१.५ औन्स) कच्च्या बदाम खाल्यानंतर चेन्नई शहरातील प्रौढांमध्ये जास्त वजन आणि लठ्ठपणा असलेल्या प्रभावांचे मूल्यांकन केले. यात बदाम खाणाऱ्यांच्या शरीराचे वजन आणि रक्तातील साखर या दोन्हीमध्ये सुधारणा झाली. लठ्ठपणामुळे टाइप २ मधुमेहासारख्या जुनाट आजारांचा धोका वाढतो. लोकांनी इतर स्नॅक्सऐवजी बदाम खाल्ल्यास त्यांना वजन नियंत्रित करण्यास आणि मधुमेहाचे ओझे कमी करण्यास मदत करू शकते, असे डॉ. मोहन यांनी सांगितले.
बदाम खाणाऱ्यांनी त्यांच्या बीटा पेशींचे वर्धित कार्य दाखवले. यात स्वादुपिंडातील पेशी इंसुलिन तयार करतात. प्री-डायबेटिस असलेल्या नागरिकांसाठी हे महत्त्वपूर्ण आहे आणि नियमित बदाम खाल्ल्याने मधुमेह सुरू होण्यास विलंब होतो. एकूण कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सचे स्तर चांगले होते. ज्याद्वारे लठ्ठपणा आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, असे लेखिका गायत्री राजगोपाल म्हणाल्या. वनस्पतीजन्य पदार्थ खाणे आणि तळलेले स्नॅक्स कमी करणे गरजेचे आहे. त्याऐवजी २८ ग्रॅम बदाम दररोज खाल्ल्यास ६ ग्रॅम वनस्पती प्रथिने प्रदान करतात, असे डॉ. अंजना यांनी सांगितले.