
ऑक्टोबरमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद ऑक्टोबरमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद
मुंबई, ता. १७ ः केंद्राशी समन्वय साधून उद्योग वाढीतून विदर्भ, मराठवाड्यापर्यंत विकासाची गंगा पोहोचवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. याच हेतूने परदेशी उद्योगांना आकर्षित करण्यासाठी येत्या ऑक्टोबर महिन्यात मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषद आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (ता.१७) दिली.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रिज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी शिंदे यांनी ही घोषणा केली. डावोसमधील गुंतवणूक परिषदेत झालेल्या सव्वा लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांच्या अंमलबजावणीचे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणखी प्रगत होईल, असेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्र चेंबरतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनाच्या आयोजनाचीही त्यांनी स्तुती केली. या माध्यमातून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना चांगले व्यासपीठ मिळेल. जगभरातील छोटे विक्रेते आणि मोठ्या उद्योगांना व उत्पादकांनाही येथे विक्रीची संधी मिळेल तसेच आर्थिक उलाढाल होऊन अर्थव्यवस्था चालना मिळेल असेही शिंदे म्हणाले.
राज्यातील व्यापाराला चालना देण्यासाठी व छोट्या विक्रेत्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे प्रदर्शन उत्तम व्यासपीठ आहे. येथे खरेदीदार आणि विक्रेते यांचा संवाद होऊन विक्री होईल. विविध उद्योगातील सहभागींना एकाच छताखाली आणणारे ग्राहकोपयोगी वस्तू तसेच यंत्रसामग्री यांचे हे प्रदर्शन आहे, असे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी उद्योगमंत्री उदय सामंत, चेंबरचे करुणाकर शेट्टी, आशिष पेडणेकर उपस्थित होते. हे प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत खुले राहील.