कॉपीमुक्त परीक्षेवर भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॉपीमुक्त परीक्षेवर भर
कॉपीमुक्त परीक्षेवर भर

कॉपीमुक्त परीक्षेवर भर

sakal_logo
By

मुंबई, ता. १८ : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या लेखी परीक्षेला मंगळवारपासून (ता. २१) सुरुवात होत आहे. या परीक्षेची सर्व तयारी मंडळाकडून करण्यात आली आहे. ही परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, म्हणून पहिल्यांदाच कॉपीमुक्त अभियानासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना मंडळाने नव्याने केल्या आहेत. त्यामुळे यंदा राज्यातील परीक्षा अत्यंत सुरळीत होणार असल्याची माहिती देण्यात आली.

राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा मंडळाच्या नऊ विभागीय मंडळांतून घेतली जाईल. ही परीक्षा बरोबर एक महिना म्हणजेच २१ मार्चपर्यंत चालणार आहे. परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची अंगझडती घेतली जाणार आहे; तर कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबविले जावे म्हणून ग्रामविकास, महसूल आणि महिला बाल विकास या विभागांची मदत घेतली जाणार आहे. शाळांमध्ये अनेक बैठी भरारी पथके त्यासोबतच इतर भरारी पथके नेमण्यात आली आहेत. पेपर वितरण करताना परीक्षा केंद्रांवर त्याचे चित्रीकरण केले जाणार आहे. ज्या परीक्षा केंद्रावर पेपर पोहोचले जाणार आहेत, त्या वाहनांना आणि अधिकाऱ्यांना जीपीएसच्या माध्यमातून जोडले गेले आहे, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक ठिकाणाची माहिती मंडळाकडे उपलब्ध होणार असल्याची माहिती ही मंडळाकडून आज (ता. १८) देण्यात आली.

समुपदेशनाची सोय
परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे मानसिक दडपण येऊ नये, म्हणून मंडळाकडून प्रत्येक विभागीय मंडळामध्ये समुपदेशन आणि हेल्पलाईनची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अनेक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा काळामध्ये कोणत्याही अडचणी येऊ नये, म्हणून यापूर्वीच मंडळाकडून प्रत्येक कनिष्ठ महाविद्यालय आणि माध्यमिक शाळांना सूचना देण्यात आली आहे.

बहिष्काराचा कामकाजावर परिणाम नाही
राज्यात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनांनी उत्तरपत्रिका आणि त्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला असला, तरी त्याचा कोणताही प्रभाव मंडळाच्या कामकाजावर पडणार नाही. मंडळाकडून गरज पडल्यास इतर पर्यायी यंत्रणा उभी केली जाणार आहे. शिवाय कोणतेही पेपर तपासणीपासून राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्यासाठी मंडळाने नियोजनही केले असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थ्यांना अधिक कालावधी
यंदाच्या शैक्षणिक वर्षात बारावीच्या परीक्षेला राज्यातून सुमारे १४ लाखाच्या दरम्यान विद्यार्थी परीक्षेला बसण्याची शक्यता आहे. मंडळाने काही दिवसांपूर्वी पेपर वाचण्यासाठी दहा मिनिटे अधिक देण्याची सवलत रद्द केली होती; मात्र आता ती सवलत पेपरच्या अखेरीस दिली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत मागील वर्षातील परीक्षाप्रमाणेच दहा मिनिटांचा अधिकचा अवधीही मिळणार आहे.