पशुखाद्यासाठी तेलबियांच्या पेंडेची यावर्षी विक्रमी निर्यातवाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पशुखाद्यासाठी तेलबियांच्या पेंडेची यावर्षी विक्रमी निर्यातवाढ
पशुखाद्यासाठी तेलबियांच्या पेंडेची यावर्षी विक्रमी निर्यातवाढ

पशुखाद्यासाठी तेलबियांच्या पेंडेची यावर्षी विक्रमी निर्यातवाढ

sakal_logo
By

मुंबई, ता. २० : तेलबियांमधील तेल काढल्यावर उरणाऱ्या चोथ्याचे पशुखाद्य तयार करण्यासाठी केलेल्या पेंडची भारतातून होणाऱ्या निर्यातीत यंदा जानेवारीत विक्रमी म्हणजे १६७ टक्के वाढ झाली आहे.

देशातील तेल व्यापारी आणि उत्पादक यांची सर्वोच्च संघटना असलेल्या सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टर्स असोसिएशन अर्थात एसईएतर्फे ही माहिती देण्यात आली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात चार लाख ७२ हजार टन तेलबियांच्या चोथ्यापासून निर्मित पेंडची निर्यात झाली. मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यात ही निर्यात फक्त एक लाख ७६ हजार टन एवढीच होती. ही वाढ १६७ टक्के आहे; तर एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत ३२ लाख ९७ हजार टन तेलबियांच्या पेंडची निर्यात झाली. मागील वर्षीच्या याच कालावधीत जेमतेम वीस लाख टन निर्यात झाली होती. त्यापेक्षा यंदाची निर्यात ७० टक्के जास्त आहे. या आर्थिक वर्षातील पहिल्या दहा महिन्यांत मोहरीच्या तेलबियांच्या चोथ्याच्या पेंडची निर्यात विक्रमी म्हणजे १९ लाख १० हजार टन झाली. या आधीचा विक्रम सन २०११ मध्ये बारा लाख ४८ हजार टनांचा होता. सध्या भारतातून दक्षिण कोरिया, व्हिएतनाम, थायलँड व अन्य पूर्वेच्या देशांना मोठ्या प्रमाणावर मोहरी तेलबियांच्या पेंडची निर्यात केली जाते. याला प्रतिटनामागे अडीचशे ते ४२८ डॉलर असा दर मिळतो. त्यामुळे या वर्षीच्या रब्बी हंगामातील मोहरीच्या लागवड क्षेत्रातही वाढ होऊन ती एकूण ९८ लाख हेक्टरपर्यंत गेली आहे. आधी ती ९१ लाख हेक्टरपर्यंतच होती.

-------
पेंडेतून पशूंना पुरक जीवनसत्त्वे
तीळ, शेंगदाणा, मोहरी, सोयाबीन आदी तेलबियांमधून तेल काढल्यानंतर उरलेला चोथा पशुखाद्य म्हणून वापरला जातो. त्यात त्यासाठी अन्य खाद्यपदार्थ आणि जीवनसत्त्वे मिसळली जातात.