यिन मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात
यिन मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात

यिन मंत्रिमंडळाच्या अधिवेशनाला सुरुवात

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन)तर्फे आयोजित केलेल्या शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला बुधवारपासून मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरुवात झाली. या विशेष अधिवेशनाला राज्यभरातील सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळी ८ वाजल्यापासून सुरू झालेल्या या अधिवेशनाला वेगवेगळ्या मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. शुक्रवारपर्यंत हे अधिवेशन सुरू राहणार असून या माध्यमातून वेगवेगळ्या वर्गातील अधिकारी व्यक्तींचे मार्गदर्शन, मंत्रिमंडळातील सदस्यांची भाषणे विद्यार्थ्यांना ऐकायला मिळणार आहेत. यंदाचे यिनचे सहावे वर्ष असून पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदी महिला विराजमान झाली आहे. यासह काही महत्त्वाच्या पदावरही महिला बिग्रेडची नियुक्ती झाली आहे. मुख्यमंत्रिपदी आचल डवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास ६६ लाखांहून अधिक विद्यार्थी या व्यासपीठाशी जोडले गेले आहेत.
...
यंदा महाविद्यालयांतर्गत यिन क्लब तयार केला गेला आहे. वर्षभर अनेक उपक्रम या यिनअंतर्गत राबवले जातात. मुलांचा व्यक्तिमत्त्व विकास आणि लिडरशीप क्वालिटी घडवण्यास यातून मदत होते. आतापर्यंत पाच हजारांपेक्षा जास्त उपक्रम राबवले आहेत. यंदाचे सहावे मंत्रिमंडळ आहे.
- श्मामसुंदर माडेवार, व्यवस्थापक, यिन महाराष्ट्र
...
मंत्रिमंडळाला शपथ
पहिल्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, ‘सकाळ’ पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी पहिल्या सत्रात मंत्रिमंडळातील सदस्यांना मार्गदर्शन केले. तसेच पहिल्या सत्रात राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळातील मंत्र्यांना शपथ देण्यात आली. युवा पिढीत नेतृत्व तयार व्हावे, हा यिनचा प्रमुख उद्देश असल्याचे मत सर्वच मान्यवरांनी मांडले. शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्रिपदी आचल डवले व उपमुख्यमंत्रिपदी काजल चव्हाण, तसेच गृहमंत्रिपदी प्रज्वल फाळके, अर्थमंत्रिपदी गीतांजली देवकर; तर सभापतिपदी सलोनी सिंह, उपसभापतिपदी अभिषेक कोल्हे यांची निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेतेपदी चिराग खातेखाय, राज्य संपर्कप्रमुख राजलक्ष्मी, आरोग्य समिती अध्यक्ष योगिराज खाडे यांची निवड झाली आहे.
...
ठराव... चर्चा... गदारोळ
यिनच्या मंत्रिमंडळातील सदस्यांनी वेगवेगळ्या दहा ठरावांवर चर्चा केली. यावर विरोधकांनी विरोध करत अनेक ठरावांमध्ये बदल आणि काही सूचना सुचवल्या. तसेच अनेक मुद्द्यांवरून सभागृहात गदारोळ झाला. काही काळासाठी कामकाज तहकूबही झाले. पोलिस भरतीवरील ठराव या मंत्रिमंडळातील सदस्यांनी मांडला, यावर गृहमंत्र्यांनी जातीने लक्ष घालू, असे आश्वासन दिले.
...
जल्लोष आणि उत्साह
बुधवारी यिनच्या सहाव्या शॅडो कॅबिनेटला सुरुवात झाली. सदस्यांनी मोठ्या जल्लोष आणि उत्साहाच्या वातावरणात पहिल्या दिवशी उपस्थिती लावली. मंत्रिमंडळातील सदस्यांना एकूण १० विषयांवरील ठराव मांडण्यास सांगण्यात आले होते. एमपीएससी व यूपीएससीच्या रखडलेल्या नियुक्त्यांविषयी सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांनी आपली भूमिका मांडली. यावर सत्ताधारी पक्षांनी लवकरात लवकर यावर निर्णय घेत नियुक्त्या केल्या जातील, असे आश्वासन दिले.
...
वरिष्ठांच्या तंबीनंतर कामकाज शांततेत
पहिल्यांदाच सभागृहाचा अनुभव घेतल्याने काही मंत्र्यांनी सभागृहाची शिस्त आणि शांतता भंग केला. सभापतींच्या आदेशानंतरही गदारोळ थांबला नाही. अखेरीस वरिष्ठांना यात हस्तक्षेप करावा लागला आणि सभागृहाचे नियम सांगावे लागले. त्यानंतर पुन्हा कामकाज सुरळीत सुरू झाले.
...
यिनची सहा मूल्ये...
योगा व मेडिटेशन
आर्थिक साक्षरता
उद्योजकता
सर्जनशील विचार
भावनिक आणि मानसिक फिटनेस
सेवा