
इसिस मॅनेजमेंट शिका : निसार तांबोळी
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : आयुष्यात चांगले लीडर बनायचे असेल, तर ‘क्रायसिस मॅनेजमेंट’ जमायला हवे. कारण कोणत्याही क्षेत्रात नेतृत्व करायचे असेल, तर अनेक प्रकारच्या अडीअडचणी आणि संकटांचा सामना करावा लागतो, असे मत मुंबईचे अतिरिक्त पोलिस आयुक्त निसार तांबोळी यांनी व्यक्त केले. यिन मिनिस्ट्रीच्या सुरू असलेल्या अधिवेशनात आज प्रमुख वक्ते म्हणून ते उपस्थित होते. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना ‘नेतृत्वविकास’ या विषयावर मार्गदर्शन केले.
समाजात वेगवेगळ्या प्रकारचे लीडर असतात. काही कष्टाने स्वतःला घडवतात. काही वारसा हक्काने येतात. काही समाजातून पुढे येतात, तर काही लोकांवर थोपवले जातात. खऱ्या लीडरला मात्र आयुष्यात कठीण परीक्षेचा सामना करावा लागतो, असे सांगत त्यांनी नेल्सन मंडेला यांच्या जीवनावर आधारित ‘इंव्हिक्टर’ हा इंग्रजी सिनेमा बघण्याचा सल्लाही विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. कधी भावनात्मक संकटे उभी राहतात. अशा वेळी नाउमेद होऊ नका, तर त्यावर मात करून पुढे जा. मनात भीती असली, तरी चिंता करू नका; पण त्या भीतीतून कसे मुक्त होता येईल, याचा प्रयत्न करा. आत्मविश्वास वाढवा. कारण त्यामुळे ताकद मिळते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
काम करत असताना दबाव येतोच, असे नाही; पण दबाव आला तरी आपण आपले काम करत राहायचे. यासाठी दबाव हाताळण्याची कला आपल्याला अवगत हवी. आपल्या आवडीच्या क्षेत्रात जा, ज्यातून आनंद मिळेल, असेच क्षेत्र निवडा. सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.