
पवईतील सायकल ट्रॅकचा मुंबईकरांवर भुर्दंड नको!
मुंबई, ता. २२ : पवई तलाव परिसरातील सायकल ट्रॅक बेकायदा असल्याचा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता महापालिकेतर्फे तो काढून टाकण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेच्या जल अभियंता विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सायकल ट्रॅक हटवण्यासाठी सुमारे ६६ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. मात्र, जबाबदार पालिका अधिकाऱ्यांकडून तो वसूल करावा, अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी केली आहे.
सायकल ट्रॅकच्या मुद्द्यावर बोलताना रवी राजा यांनी सांगितले, की पवईतील सायकल ट्रॅक काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. ट्रॅकला पर्यावरणवादी संस्थांनी आणि काँग्रेसच्या वतीनेही विरोध करण्यात आला होता. तरीही सायकल ट्रॅक उभारला गेला. पालिका अधिकाऱ्यांची ही चूक असून ट्रॅक तोडण्याचा खर्च त्यांच्याकडून वसूल करावा. त्याचा भुर्दंड मुंबईकरांवर नको, असेही रवी राजा म्हणाले.
पालिका पवई तलावाशेजारी उभारत असलेल्या जॉगिंग आणि सायकल ट्रॅकला मुंबई उच्च न्यायालयाने बेकायदा ठरवले होते. इतकेच नाही, तर परिसरात केलेले बांधकाम तत्काळ हटवून तलाव क्षेत्र पूर्ववत करण्यास सांगितले होते. सायकल ट्रॅक काढण्याचे सोडून पालिकेने मात्र त्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, नंतर ती मागे घेतली होती.
तलावातील मगरींना धोका
पाण्यात भराव टाकून साधारण ५० मीटरहून अधिक लांबीपर्यंतचा सायकल ट्रॅक बांधण्याची सुरुवात केली गेली होती. त्यासाठी सहा ते आठ मीटर रुंदीचा भराव टाकण्यात आला. या बांधकामामुळे तलावाचे क्षेत्रफळ सुमारे चार टक्के कमी होणार होते. शिवाय या परिसरातील झाडांनाही धोका पोहोचणार होता. त्याची झळ तलावातील मगरींना पोचण्याची भीतीही पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केली होती.