
डीआरडीओच्या टर्बोजेट इंजिनाचे कंत्राट गोदरेज एरोस्पेसकडे
मुंबई, ता. २६ : डीआरडीओसाठी टर्बोजेट इंजिनाचे आठ मॉड्यूल तयार करण्याचे काम ‘गोदरेज अँड बॉयस’च्या ‘गोदरेज एरोस्पेस’ला मिळाले आहे. अशा प्रकारची इंजिने तयार करणारी ही देशातील पहिलीच खासगी कंपनी ठरली आहे. ही इंजिने विविध प्रकारच्या हवाई उपकरणांमध्ये वापरली जातील. ‘गोदरेज एरोस्पेस’ने अन्य पंचवीस कंपन्यांशी स्पर्धा करून हे काम मिळवले.
कंपनीकडील चांगल्या उत्पादन सुविधा, कामातील व्यावसायिकपणा, रॉकेटसाठी द्रवरूप इंधनावर चालणारी इंजिने तयार करण्याचा अनेक दशकांचा अनुभव, तसेच जगभरातील हवाई वाहतूक कंपन्यांना दिलेली सेवा आदी बाबी विचारात घेऊन त्यांना हे काम देण्यात आले. या कामामुळे आता यापुढेही देशातच स्वतंत्रपणे हाती घेण्यात येणाऱ्या स्वदेशी प्रकल्पांचे कामही ‘गोदरेज एरोस्पेस’ला मिळेल, अशी खात्री कंपनीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. जगातील मोठ्या कंपन्या आता भारतात उत्पादन प्रक्रियेमध्ये रस दाखवीत असताना विविध प्रकारची इंजिने बनविण्याची मागणी कंपनी पूर्ण करेल, असे ‘गोदरेज एरोस्पेस’चे सहउपाध्यक्ष व बिझनेस हेड माणेक बेहरामकमदिन यांनी सांगितले. हे काम म्हणजे आमच्या उत्पादनक्षमता व ज्ञान यांना मिळालेली पावती आहे. भारताला या क्षेत्रात स्वयंपूर्ण करण्याच्या आमच्या उद्दिष्टाकडे या कामामुळे एक पाऊल पुढे टाकले जाईल. यामुळे प्रवासी-मालवाहतुकीच्या विमानांसाठी इंजिन तयार करण्याच्या प्रकल्पांचा मार्ग मोकळा होईल. तसेच विविध लढाऊ विमानांची इंजिन तयार करण्यात देशाला स्वयंपूर्ण होण्यातही आम्ही हातभार लावू, असेही त्यांनी सांगितले.
---
पाचशे कोटींची गुंतवणूक
कंपनीने आपल्या विविध संरक्षण व हवाई वाहतूक तंत्रज्ञान प्रकल्पांमध्ये पाचशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच उत्पादन प्रक्रियेतही नव्या अत्याधुनिक बाबींचा समावेश केला आहे.
- माणेक बेहरामकमदिन, सहउपाध्यक्ष व बिझनेस हेड, गोदरेज एरोस्पेस