भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान
भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप प्रदान

sakal_logo
By

मुंबई, ता. २६ : ‘कोसला’कार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील योगदानासाठी साहित्य अकादमीने फेलोशिप आज (ता. २६) प्रदान केली. दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सुरेंद्र गावसकर सभागृहात साहित्य अकादमीने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात अकादमीचे अध्यक्ष व कन्नड साहित्यिक डॉ. चंद्रशेखर कंभार आणि सचिव के. श्रीनिवासराव यांच्या हस्ते नेमाडे यांना फेलोशिप प्रदान करण्यात आली.

नेमाडे यांच्या साहित्यावरील योगदानासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ‘संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी साहित्यिक प्रदीप देशपांडे, प्राची गुर्जरपाध्ये यांनी विचार मांडले. या वेळी के. श्रीनिवासराव यांनी नेमाडे यांच्या साहित्याचे योगदान स्पष्ट करत ही फेलोशिप देण्यामागील भूमिका स्पष्ट केली. मराठी भाषेतील लेखकाला साहित्य अकादमीचा तब्बल २६ वर्षांनंतर सन्मान मिळत आहे. यापूर्वी विंदा करंदीकर यांना या फेलोशिपने सन्मान‍ित करण्यात आले होते, अशी माहिती त्यांनी दिली. अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंभार यांनी नेमाडे यांना देण्यात आलेल्या फेलोशिप आणि त्यांच्या साहित्यातील योगदानाचा गौरव करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

साहित्य अकादमीच्या या सन्मानामुळे मी देशातील सन्मानित असलेल्या २५ भाषांतील लेखकांच्या यादीत जाऊन बसलो असल्याने सुखावलो असल्याची भावना नेमाडे यांनी व्यक्त केली. तसेच अकादमीचे आभारही मानले. मी शेतकरी कुटुंबातील संस्कारात वाढलो. त्यामुळे मी ''कर्मण्येवाधिका'' याप्रमाणे काम करत राहणे पसंत करतो. शेतकरी कुटुंबातील असल्याने पेरण्यापेक्षा आम्ही जोपासण्यावर अधिक भर देतो. त्यामुळेच साहित्याच्या क्षेत्रात लिहिण्यापेक्षा वाचन, चिंतन, निरीक्षण आदी बाबी करत असतो. त्यामुळे दरवर्षी पेरणे हे माझ्या रक्तातच असल्याचे नेमाडे म्हणाले. मराठीतील संत आणि लेखकांनी इतर भाषांमध्येसुद्धा साहित्य निर्माण केल्याचे सांगत मराठी साहित्य विश्व हे सर्वव्यापी असल्याची माहितीही त्यांनी दिली.

लेखकांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी नेमाडे यांना मिळालेला साहित्य अकादमीच्या फेलोशिपचा बहुमान हा महाराष्ट्रीय लोकांचा बहुमान असल्याचे विधान केले. तसेच नेमाडे यांनी मराठी साहित्याचे क्षितिज व्यापक करण्याचे काम केले. त्यांच्यामुळे सगळ्या पिढीच्या लेखकांना आत्मविश्वास मिळाला. त्यामुळे सांस्कृतिक बळ निर्माण करणारा लेखक आपल्यात आहे, हे आपले भाग्य असल्याचे पठारे म्हणाले.