
पुण्याच्या बीआरटीएसचा संयुक्त राष्ट्रसंघात गौरव
मुंबई, ता. २७ ः संयुक्त राष्ट्रसंघातर्फे नुकत्याच आयोजित इंटरनॅशनल डे फॉर वूमन अँड गर्ल्स इन सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पुण्याच्या बीआरटीएस वाहतूक पद्धतीचा तसेच भारतात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचा गौरवपूर्वक उल्लेख करण्यात आला.
इराकचे शेवटचे राजे फैजल यांच्या कन्या राजपुत्री निश्रीन अल हशमीत यांनी स्थापन केलेल्या रॉयल अकादमी ऑफ सायन्स इंटरनॅशनल ट्रस्ट (राशीट) तर्फे हा दिवस साजरा केला जातो, त्यास संयुक्त राष्ट्रसंघाने मान्यता दिली आहे. यानिमित्ताने ११ फेब्रुवारी रोजी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्यालयात मोठा परिसंवाद झाला.
लॅबेनॉनच्या वाहतूक तसेच शिक्षणतज्ज्ञ प्रा. जुमाना तौफाली यांनी पर्यावरणपूरक व कार्यक्षम वाहतूक यंत्रणा वापरणाऱ्या जगातील प्रमुख दहा शहरांचा उल्लेख केला. त्यात पुण्यातील बीआरटीएस वाहतूक यंत्रणेची वैशिष्ट्येही त्यांनी सांगितली. कार्यक्रमाच्या संचालक प्रिया सामंत यांनीही आपले विचार मांडले. या परिसंवादात तरुण विद्यार्थ्यांसह पाचशे मान्यवर सहभागी झाले होते. विज्ञान व तंत्रज्ञानाद्वारे महिला सक्षमीकरणाच्या प्रयत्नांवरही या वेळी भर देण्यात आला. सत्यगिरी ग्रुपचे अध्यक्ष तसेच आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सचे पदाधिकारी दिनेश जोशी जलवाहतूक क्षेत्रातील आणि महिला सक्षमीकरणातील तज्ज्ञ या नात्याने विशेष निमंत्रित होते. त्यांनीदेखील भारतात पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला.
----------
पंतप्रधानांचा पुढाकार
भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनीही पर्यावरणपूरक इंधन आणि वाहतुकीसाठी पुढाकार घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहने, इथेनॉलचे मिश्रण आदींद्वारे या क्षेत्रात आम्ही लवकरच जगात आघाडी घेऊ, असा विश्वासही दिनेश जोशी यांनी व्यक्त केला.