शेअरबाजारात सलग आठवी पडझड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेअरबाजारात सलग आठवी पडझड
शेअरबाजारात सलग आठवी पडझड

शेअरबाजारात सलग आठवी पडझड

sakal_logo
By

मुंबई, ता. २८ : धातूनिर्मिती कंपन्या, औषधनिर्मिती कंपन्या आणि आयटी कंपन्या यांच्या शेअरच्या विक्रीमुळे आज भारतीय शेअर बाजारांनी सलग आठवी घसरण नोंदवली. सेन्सेक्स ३२६.२३ अंशांनी; तर निफ्टी ८८.७५ अंशांनी घसरला. या घसरणीमुळे सेन्सेक्स आज एकोणसाठ हजारांच्या खाली गेला. दोन्ही शेअर बाजार सुमारे अर्धा टक्का घसरले.

आज जागतिक शेअर बाजारात प्रतिकूल वातावरण असल्यामुळे भारतीय शेअर बाजारांची सुरुवातच अडखळत झाली. त्यानंतर दिवसभर सतत त्यात घसरण होत राहिली, शेवटच्या तासा-दीड तासात थोडी खरेदी झाल्यामुळे बाजार सावरला. मात्र सेन्सेक्सला एकोणसाठ हजारांच्या वर बंद भाव देता आला नाही. दिवसाअखेरीस सेन्सेक्स ५८,९६२.१२ अंशावर; तर निफ्टी १७,३०३.९५ अंशावर स्थिरावला.

व्याज दरवाढीच्या टांगत्या तलवारीमुळे आज जागतिक शेअर बाजारांप्रमाणेच भारतीय शेअर बाजारातही थंड वातावरण होते. त्यातच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची विक्री आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या व्याजदर वाढीबाबतच्या भूमिकेमुळे गुंतवणूकदारांनी विक्रीचे धोरण अवलंबले. आज एफएमसीजी व ग्राहकोपयोगी क्षेत्रच काय ते काहीसे तेजीत होते.

सेन्सेक्सच्या प्रमुख ३० पैकी २१ शेअरचे भाव घसरले; तर निफ्टीच्या मुख्य ५० पैकी ३३ शेअरचे भाव घसरले. निफ्टी मधील अदाणी एंटरप्राइज आज १५ टक्के वाढून १,३७१ रुपयांवर बंद झाला, अदाणी पोर्ट पाच टक्के वाढला. एशियन पेंट, ब्रिटानिया, महिंद्र आणि महिंद्र या शेअरचे भावही वाढले; तर निफ्टीमध्ये सिप्लाच्या शेअरचा भाव पाच टक्क्यांच्या आसपास घसरला. हिंदाल्को, डॉक्टर रेड्डीज लॅब, ओएनजीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज या शेअरचे भावही दोन ते तीन टक्के घसरले; तर सेन्सेक्सच्या प्रमुख शेअरपैकी अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर, एचडीएफसी आणि एचडीएफसी बँक तेजीत होते. टाटा स्टील, बजाज फिन्सर्व्ह, इन्फोसिस, आयटीसी, एअरटेल, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, टेक महिंद्र या शेअरचे भाव एक ते दोन टक्का घसरले.

कोट
..............
अर्थव्यवस्थामधील मंदी, चलनवाढ आणि व्याजदरवाढ यामुळे जागतिक गुंतवणूकदारही खरेदीत फार उत्साही नाहीत. त्यातच कंपन्यांचे उत्पन्नही कमी होण्याची भीती असल्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठिकाणी गुंतवत आहेत. भरीस भर म्हणून भारतीय शेअर बाजार अन्य चांगल्या शेअर बाजारांच्या तुलनेत महाग असल्याचाही फटका भारताला बसतो आहे.
- विनोद नायर, जिओजिट फायनान्स

रुपया १५ पैसे वाढला
.....................
चलन व्यवहारात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करून केलेली डॉलर विक्री आणि विविध वस्तूंच्या दरात झालेली घसरण यामुळे आज भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत १५ पैशांनी वाढून ८२.६४ वर बंद झाला. आज व्यवहार सुरू झाल्यावर रुपयाचा भाव ८२.६९ होता. नंतर व्यवहारादरम्यान तो घसरून ८२.७५ पर्यंत गेला; तर दुसरीकडे तो ८२.६३ पर्यंत उंचावलाही होता.