
कफ सिरफच्या २७ कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : औषध प्रशासन विभागाने कफ सिरप तयार करणाऱ्या ८४ कंपन्यांची तपासणी केली. यातील १७ दोषी कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, ४ कंपन्यांचे उत्पादन बंद; तर ६ कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिली. भाजप आमदार आशीष शेलार यांनी याबाबत लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. तसेच दोषी कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही शेलार यांनी केली होती.
राज्यातील २०० औषध उत्पादकांकडून तयार करण्यात येणारी दोन हजारहून अधिक औषधे कोणत्याही प्रकारच्या स्थिरता चाचणी प्रमाणपत्र न घेताच निर्यात होत असल्याचे फेब्रुवारी महिन्यात आढळून आले. त्यामुळे याची सखोल चौकशी करून, त्यांचे परवाने रद्द करून कारवाई करण्याची मागणी करीत आशीष शेलार यांनी केली होती. यावर उत्तर देताना मंत्री संजय राठोड यांनी सांगितले, की जागतिक आरोग्य संघटनेने गांबियामधील ६६ मुलांच्या मृत्यूवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये ॲलर्ट जारी केला होता.
त्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासनाच्या ७ ऑक्टोबर २०२२ च्या परिपत्रकानुसार राज्यातील लिक्विड ओरल उत्पादन करणाऱ्या उत्पादकांची अन्न व औषध प्रशासनाने तपासणी मोहीम हाती घेतली होती. यामध्ये ८४ कंपन्यांची तपासणी करण्यात आली. ज्या उत्पादकांकडे स्थिरता चाचणीमध्ये त्रुटी होत्या, अशा एकूण २७ कंपन्या आढळून आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध आवश्यक कारवाई करण्यात येत असल्याचे राठोड यांनी सांगितले.
सिरप उत्पादकांवर कारवाईचा बडगा
- अॅलोपॅथिक उत्पादकांची संख्या - ९९६
- निर्यात करणारे उत्पादक - ५१४
- वर्षभरात किरकोळ विक्रेत्यांची तपासणी - ८,२५९
- परवाना धारकांना कारणे दाखवा नोटीस -२,०००
- परवाने रद्द - ४२४
- गुन्हा दाखल - ५६