
(मुंबई टुडे साठी )द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चित्रकला प्रदर्शनात आत्मभान आणि चिंतन करायला लावणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन
द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या चित्रकला प्रदर्शनात
आत्मभान आणि चिंतन करायला लावणाऱ्या चित्रांचे प्रदर्शन
मुंबई, ता. ५ : द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाचे १०५ वे चित्र शिल्प प्रदर्शन मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत सुरू आहे. देशभरातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि इतर चित्रकारांच्या अनोख्या चित्रकृती त्यात मांडण्यात आल्या आहेत. एकाच वेळी आत्मभान आणि दुसरीकडे मानवी भावना व त्यांच्या मेंदूला चालना देणारी अनेक चित्रे प्रदर्शनात असून मुंबईकरांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. ६ मार्चपर्यंत प्रदर्शन सुरू राहणार आहे. प्रदर्शनामध्ये देशभरातील दोन हजारांहून अधिक चित्रकार आणि शिल्प कलावंतांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी मोजक्याच दोनशे चित्रकारांचे व काही शिल्पकारांचे शिल्प मांडण्यात आले असल्याची माहिती द आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या सचिव अलका व्होरा यांनी दिली. मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांची चित्रे असल्याचे त्यांनी सांगितले. द आर्ट सोसायटी ऑफ इंडिया संस्थेच्या स्थापनेला यंदा १०५ वर्षे पूर्ण झाली. त्या पार्श्वभूमीवर जहांगीर आर्ट गॅलरीतील अनेक सांस्कृतिक संदर्भ आणि विविध विषय घेऊन लावण्यात आलेल्या चित्रांचे प्रदर्शन प्रेक्षकांना आकर्षित करत आहे. संस्थेकडून यंदा अनेक चित्रकार व कलावंतांना शिष्यवृत्तीही प्रदान करण्यात आली. अनेक चित्रांना सुवर्ण व कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. सुरभी गुळवेलकर आणि महेश घरत यांच्या चित्राला सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले. रुद्रा मंडल यांच्या चित्रांनाही रौप्य आणि तापिष सोनी यांच्या चित्राला कांस्यपदक देऊन गौरवण्यात आले. अभिजीत पाटोळे यांनी रेखाटलेले स्वतःशी संवाद करणारे चित्र खास आकर्षण ठरले. संस्थेच्या वतीने अत्यंत सन्मानाचा असलेला ‘कला सृजन’ जीवनगौरव पुरस्कार यंदा ज्येष्ठ चित्रकार प्रा. श्रीकांत जाधव यांना प्रदान करण्यात आला. शिक्षक ते चित्रकार असा प्रवास करणाऱ्या जाधव यांचे चित्रकलेच्या क्षेत्रात खूप मोठे योगदान असून त्यासाठीच त्यांचा पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.