‘आसाम टुरीझम’चा मुंबईत रोड शो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आसाम टुरीझम’चा मुंबईत रोड शो
‘आसाम टुरीझम’चा मुंबईत रोड शो

‘आसाम टुरीझम’चा मुंबईत रोड शो

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : निवांत भटकंती, साहसी खेळ, जंगल पर्यटन आणि चित्रीकरणासाठी एकाहून एक सुंदर स्थळे असलेले आसाम हे अत्यंत नितांतसुंदर ठिकाण असल्याची ग्वाही आसाम पर्यटन विभागाच्या रोड शोद्वारे मुंबईत सोमवारी देण्यात आली.

या वेळी आसामचे पर्यटनमंत्री जयंत मल्ल बारुआ व अन्य वरिष्ठ अधिकारी हजर होते. आसामात चित्रीकरणासाठी एकखिडकी योजनेद्वारे तात्काळ संमती दिली जाईल, अशी माहितीही या वेळी देण्यात आली. या वेळी आसाम टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात दोन्ही राज्यांमध्ये पर्यटन वाढीसाठी एकमेकांना सहाय्य करण्याबाबत सामंजस्य करारावरही स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

आसाममध्ये चित्रपट चित्रीकरण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी इज ऑफ डुईंग बिझनेससह चित्रपट निर्मात्यांना अनेक सुविधा तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साह्य दिले जाते. आसाममधील रस्त्यांचे जाळे तसेच कायदा व सुव्यवस्थादेखील अत्यंत चांगली आहे. आसाम हे धार्मिक व अध्यात्मिक पर्यटन, घनदाट जंगले तसेच विस्तीर्ण नद्यांमधील पर्यटन तसेच धाडसी खेळांचे पर्यटन यांच्यासाठी विख्यात आहे असेही बारुआ म्हणाले. चित्रपट व पर्यटन क्षेत्रातील लाभधारकांशी सल्लामसलत करून आसामला सगळ्यात मोठे चित्रपट चित्रीकरण पर्यटनस्थळ म्हणून प्रस्थापित करू असेही त्यांनी सांगितले.

-------
पर्यटन प्रकल्पांसाठी करार
सरकारने टाटा, हयात यासारख्या मोठ्या समूहांबरोबर काझीरंगा, मानस आदी ठिकाणी मोठ्या पर्यटन प्रकल्पांसाठी करारही केले आहेत. सरकारने नुकताच पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून त्यामुळे राज्यात या क्षेत्रात खासगी गुंतवणुकीला मोठी चालना मिळेल, अशी खात्रीही त्यांनी व्यक्त केली. आसाम टुरिझमची अत्याधुनिक वेबसाईटही तयार करण्यात आली असून याद्वारे पर्यटकांना हॉटेलचे ऑनलाईन बुकिंग, सफारीची आगाऊ नोंदणी आदी सर्व गोष्टी एकाच क्लिकवर करता येतील.