
‘ड्राईव्ह लाईक अ लेडी’ कोटक इन्शुरन्सचा उपक्रम
मुंबई, ता. ७ : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त कोटक महिंद्र जनरल इन्शुरन्सने आझाद फाऊंडेशनच्या साह्याने महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी ‘ड्राईव्ह लाईक ए लेडी’ हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम महिनाभर चालणार असून यात बसचालक झालेल्या अनिता यांची संघर्षमय कहाणी दाखवण्यात आली आहे. अनिता यांनी घरगुती हिंसाचारासह अनेक अडचणींना तोंड देऊन दिल्ली परिवहन सेवेत बसचालक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. या प्रवासात त्यांना ‘आझाद फाऊंडेशन’ची साथ मिळाली. अशाच स्वयंपूर्ण महिलांच्या धडपडीच्या कहाण्या या मोहिमेदरम्यान दाखवून महिलांना प्रोत्साहित केले जाईल. महिलांनी त्याच त्याच चाकोरीत काम न करता स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रसंगी पुरुषांची मक्तेदारी असलेले वेगळे मार्गही स्वीकारावेत, असाही संदेश यामार्फत दिला जाईल, अशी माहिती कोटक महिंद्रा जनरल इन्शुरन्सचे एमडी व सीईओ सुरेश अग्रवाल यांनी दिली.