
भारताची निर्यात ७५० अब्ज डॉलरवर जाण्याची शक्यता
मुंबई, ता. ७ : या वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंतच्या निर्यातीची आकडेवारी पाहता आपण या आर्थिक वर्षात ७५० अब्ज डॉलर मूल्याची सामुग्री निर्यात करण्याचा टप्पा ओलांडू, असा विश्वास केंद्रीय व्यापारमंत्री पियूष गोयल यांनी येथे व्यक्त केला. गोयल यांच्या हस्ते रविवारी मुंबईत अंधेरी इथे एक्सपोर्ट क्रेडिट गॅरेंटी कॉर्पोरेशनच्या (ईसीजीसी) नव्या कॉर्पोरेट कार्यालयाचे (ईसीजीसी भवन) उद्घाटन करण्यात आले, त्या वेळी त्यांनी हा विश्वास व्यक्त केला. गेल्या वर्षीच्या निर्यातीचे आकडे आपण या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यातच ओलांडले आहेत. त्यानुसार आपण स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षात ७५० अब्ज डॉलर मूल्याच्या निर्यातीचा टप्पा ओलांडू असेही ते म्हणाले. ईसीजीसीने काळानुरूप आधुनिक होऊन आपल्या व्यवहारात अधिकाधिक डिजिटल साधने वापरावीत, अशी सूचना त्यांनी या वेळी केली.
भारताला जर महाशक्ती बनायचे असेल, तर आपल्याकडे उच्च दर्जाची प्रमाणिकता, निष्ठा आवश्यक आहे. त्यासाठी सरकार, उद्योगक्षेत्र, ईसीजीसीसारखी मंडळे, एक्झिम बँक आणि इतर भागधारक या सगळ्यांनी मिळून पूर्ण प्रयत्न करायला हवेत. ईसीजीसीने ९० टक्क्यांपर्यंतच्या पतजोखमीसाठी वीस कोटी रुपयांची निर्यात मर्यादा ४० कोटींपर्यंत वाढवावी. त्याबदल्यात उद्योगक्षेत्राने आपले दावे करताना संपूर्ण प्रामाणिकता आणि सचोटी दाखवावी, अशी अपेक्षा गोयल यांनी व्यक्त केली.