सबळ पुराव्यांअभावी महिलेची निर्दोष सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सबळ पुराव्यांअभावी
महिलेची निर्दोष सुटका
सबळ पुराव्यांअभावी महिलेची निर्दोष सुटका

सबळ पुराव्यांअभावी महिलेची निर्दोष सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : रस्त्यावर विरुद्ध दिशेने दुचाकी चालवणाऱ्या महिलेविरोधात समाज माध्यमावर दाखल केलेला पुरावा गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने प्रमाणित कागदपत्रांअभावी अमान्य केला. त्यामुळे या प्रकरणात २१ वर्षीय महिलेची निर्दोष सुटका करण्यात आली.
गतवर्षी मे महिन्यात आरोपी महिला गावदेवी परिसरात विरुद्ध दिशेने दुचाकी चालवत होती. याबाबतचे छायाचित्र सायकलिंग करणाऱ्या समूहाने ट्विटरवर शेअर केले होते. त्यावरून पोलिसांनी भादंवि कलम २७९ (सुसाट गाडी चालवणे), ३३६ (दुसऱ्याच्या जीवाला धोका निर्माण करणे) असे गुन्हे दाखल केले होते; मात्र न्यायालयाने यासंदर्भात पोलिसांनी पुरावा म्हणून दाखल केलेले ट्विटरवरचे छायाचित्र अमान्य केले. संबंधित छायाचित्र सायकलिंग समूहाने शेअर केले होते; मात्र याबाबत ज्याने हे छायाचित्र अपलोड केले, त्याचा जबाब घेण्यात आला नव्हता. तसेच संबंधित छायाचित्र कोणत्या तरी ग्रुपवर आले होते. त्यानंतर ते ट्विटरवर शेअर केले, असे न्यायालयात सांगण्यात आले.
---
प्रमाणपत्रेही नाहीत!
सदर खटल्यात तीन साक्षीदार तपासण्यात आले. ट्विटरवर फोटो पोस्ट करणारा सायकलस्वार आणि ट्विटर हेल्पलाईन प्रतिनिधी हे दोन्ही साक्षीदार सुनावणीस हजर नव्हते. तसेच समाज माध्यमांवरचे छायाचित्र न्यायालयात पुरावा म्हणून दाखल केले जाते, त्या वेळी पुरावा कायद्यातील कलम ६५ ब नुसार त्या प्रकारचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; मात्र हे प्रमाणपत्रदेखील पोलिसांनी दाखल केले नाही. त्यामुळे न्यायालयाने संबंधित पुरावा अमान्य केला आणि महिलेची आरोपातून सुटका केली.