
कोटकची महिलांसाठी डिजिटल साक्षरता मोहिम
मुंबई, ता. ८ : महिलांमध्ये डिजिटल साक्षरता यावी, यासाठी डिजिटल साक्षर महिलांनी इतर सामान्य महिलांना ही कौशल्ये शिकवावीत यासाठीची मोहीम कोटक म्युच्युअल फंडाने जागतिक महिला दिनाच्या निमित्त हाती घेतली आहे. यासाठी त्यांनी समाजमाध्यमांवर व्हिडीओ प्रसारित केले, असून यात विविध प्रकारच्या डिजिटल साक्षर महिला या अन्य महिलांना ही कौशल्ये कशी शिकवू शकतील, यावर भर देण्यात आला आहे. सध्याच्या युगात डिजिटल ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे डिजिटल साक्षर महिलांनी ते ज्ञान अन्य महिलांना द्यावे, यावर या व्हिडीओमध्ये भर देण्यात आला आहे. ‘डिजिट ऑल’ असे या मोहिमेचे नाव आहे. गेल्या काही वर्षांत भारताने डिजिटल क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. भारतातील दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीच्या शहरातही डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणात आली आहे. मात्र अन्य महिला कर्मचारी यांच्यामध्येदेखील ही साक्षरता येण्यासाठी त्यांच्या सतत संपर्कात असणाऱ्या महिलांनीच प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांचे दैनंदिन जीवन अत्यंत सुखकर होईल, असा या मोहिमेमागील हेतू असल्याचे कोटक महिंद्र असेट मॅनेजमेंट कंपनीचे एमडी व सीईओ नीलेश शहा यांनी सांगितले.