विमा उद्योगाने सरकारवर अवलंबून राहू नये | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विमा उद्योगाने सरकारवर अवलंबून राहू नये
विमा उद्योगाने सरकारवर अवलंबून राहू नये

विमा उद्योगाने सरकारवर अवलंबून राहू नये

sakal_logo
By

मुंबई, ता. १० : केंद्रीय अर्थसंकल्पातून विमा उद्योगाला फार काही मिळाले नसले तरी १३० कोटी लोकसंख्येच्या भारतात विमा क्षेत्राच्या वाढीला प्रचंड वाव आहे. त्यामुळे विमा क्षेत्राने सरकारी सवलतींवर अवलंबून न राहता आपल्या हिमतीवर व्यवसाय वाढ करावी, असे एजिस फेडरल लाईफ इन्शुरन्सचे एम.डी. व सीईओ विघ्नेश शहाणे यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

सध्या विमा क्षेत्राची चढती कमान सुरू आहे. गेल्या काही वर्षांत विमा उद्योगाने अनेक बदल, चढ-उतार पाहिले. बेकारीचा काळ, राजकीय अस्थैर्याचा काळ, कोविडचा काळ, वेगवेगळ्या अर्थसंकल्पीय तरतुदी, जागतिक अस्थैर्य, नवीन करप्रणाली, यामुळे विमा क्षेत्रावर काहीही फरक पडला नाही. त्याची चढती कमान कायमच राहिली. त्यामुळे आता विमा क्षेत्राने प्रीमियमच्या रकमेपेक्षा जास्तीत जास्त लोकांना विमाछत्र मिळावे, यावर भर देऊन व्यवसाय वाढवावा, असेही शहाणे म्हणाले.

एजिस फेडरलचा सध्या देशातील विमा कंपन्यांमध्ये चौदावा क्रमांक आहे. आयडीबीआय बँकेसारखा भागीदार गेल्यावर आम्हाला नवी बँक शोधायची आहे. त्याचप्रमाणे ग्राहक मिळविण्यासाठी एजंट, डिजिटल मार्ग, ऑनलाईन मार्ग, जास्त शाखांचे जाळे आम्ही सक्षम करीत आहोत. या मार्गाने वितरण व्यवस्था बळकट करून येत्या तीन वर्षांतच पहिल्या दहा विमा कंपन्यांमध्ये क्रमांक मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट असल्याचेही शहाणे म्हणाले.

कोविडनंतर विम्याबाबत जागृती वाढली
विमा क्षेत्राला कर सवलत मिळो वा न मिळो, देशाची मोठी लोकसंख्या विमा क्षेत्रापासून वंचित आहे, तोपर्यंत या क्षेत्राची गरज भासणारच आणि त्याची वाढ होणार. कोविड काळानंतर लोकांमध्ये विम्याबाबत जागृती वाढली आहे. केवळ कर बचतीसाठी नव्हे तर संरक्षणासाठी विमा घ्यावा, यावर लोक गंभीरपणे विचार करू लागले आहेत, असेही त्यांनी दाखवून दिले.