
इमारतीला ओसी नसली तरीही पाईपगॅस देण्याचा प्रयत्न सुरू
मुंबई, ता. १२ : मुंबईसह अनेक ठिकाणी ज्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र अर्थात ओसी नसलेल्या इमारतींनाही महानगर गॅसचा पाईप गॅस देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल यांनी सकाळला दिली.
ओसी नसलेल्या इमारतींना महानगर गॅसचे कनेक्शन दिले जात नाही. अशा इमारतींनाही घरगुती गॅस सिलिंडर, विजेची जोडणी, जल जोडणी आदी अत्यावश्यक सेवा दिल्या जातातच. त्याचप्रमाणेच महानगर गॅसलादेखील ही सवलत मिळावी अशी मागणी आहे. यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यात काही तांत्रिक बाबी आड येत असल्या तरी राज्य सरकार सकारात्मक असून याबाबत लवकरच निर्णय होईल असेही सिंघल म्हणाले. महानगर गॅसचे घरगुती कनेक्शन देण्याचा खर्च पंचवीस हजार रुपये आहे, मात्र आम्हाला डिपॉझिटपोटी फक्त पाच हजार रुपये मिळतात. तरीही सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही जास्तीत जास्त ठिकाणी पीएनजी कनेक्शन देत आहोत; मात्र वायूवाहिनीसाठी रस्ता खोदल्यावर तो पुन्हा पूर्ववत करण्याचे शुल्क अवाढव्य असून ते कमी करण्याची मागणी महापालिका-सरकार यांच्याकडे केली आहे. कारण शहरांमध्ये पाईपगॅस आला तर जास्तीत जास्त सिलिंडर गावात जाऊन तेथेही प्रदूषणमुक्त इंधन मिळेल, असेही सिंघल यांनी दाखवून दिले.
---------
महानगर गॅस व्यवसाय विस्तार करणार
इलेक्ट्रिक व्हेईकल, पर्यायी इंधन या अन्य क्षेत्रांमध्ये व्यवसाय विस्ताराचा विचार सुरू आहे. महानगर गॅसला फ्यूएल स्टेशन उभारण्यासाठी किमान चारशे चौरस मीटर जागा लागते. मुंबईत जागेची टंचाई असल्याने सरकारने त्यासाठी जागा द्यावी, अशी मागणीही महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक आशु सिंघल यांनी केली आहे.