मुंबईतील प्रदूषणाची स्थिती गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईतील प्रदूषणाची स्थिती गंभीर
मुंबईतील प्रदूषणाची स्थिती गंभीर

मुंबईतील प्रदूषणाची स्थिती गंभीर

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता.१७ : मुंबईत सुरू असलेले बांधकाम प्रकल्प आणि रस्त्यावरील धूळ यामुळे हे प्रदूषण वाढल्याचा मुद्दा आमदार मिहिर कोटेचा यांची लक्षवेधीद्वारे विधानसभेत मांडला. तक्रार करून देखील कारवाईकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबई पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी ही त्यांनी केली.

याबाबत बोलगांना कोटेचा पुढे म्हणाले, की जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या मापदंडाच्या ९ पट अधिक प्रदूषण मुंबईत आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. साधारणपणे प्रदूषणाची पातळी १२० एक्युआयच्या पुढे जाते तेव्हा नेमक्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कशा करायच्या याच्या सूचना हरित लवादाने प्रदूषण मंडळाला दिल्या आहेत. यामध्ये मेट्रो, ई-बसेस, सीएनजी बस गाड्यांचा समावेश आहे. मात्र मागच्या सरकारने आणि तत्कालीन पर्यावरण मंत्र्याने त्याकडे साफ दुर्लक्ष केल्याने मुंबईतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत वाईट झाल्याचा आरोप ही त्यांनी केला.

मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकाम सुरू आहेत. त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी जबाबदार असणारे प्रकल्प तातडीने बंद करणे गरजेचे आहे. याशिवाय धूळ उडू नये यासाठी झाडू मारताना रस्त्यांवर पाणी मारणे, वॉटर स्प्रिंकल्सचा वापर करणे गरजेचे आहे, मात्र ते होतांना दिसत नाही. त्यामुळे मुंबईत कर्करोग, क्षयरोग आणि श्वसनाचे विविध आजार बळावत असल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण संवर्धन तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्र सरकारकडून राज्य सरकारला ''राष्ट्रीय हवा गुणवत्ता सुधार'' कार्यक्रमा अंतर्गत सन २०२१-२२ मध्ये ३,६०० कोटी रुपये देण्यात आले. मात्र मागील सरकारने फेब्रुवारी २०२२ पर्यंत त्यातील एक रुपयाही खर्च केला नाही. हे जेव्हा तत्कालीन पर्यावरणमंत्र्यांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी घाईघाईत बेस्टच्या ताफ्यात २०० ऐवजी ९०० ई बसगाड्या घेण्याची घोषणा केला. मात्र त्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेवर आपण आक्षेप घेतल्याने ती रद्द करण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी केला.

सर्वात जास्त प्रदूषण धुळीकणांमुळे
------------
मुंबईतील वायुप्रदूषण हे वाढत्या धुळीकणांमुळे असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात दिली. यासाठी संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती गठीत केल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावर होणारी धूळ आणि बांधकाम प्रकल्पामुळे होणारी धूळ यावर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
..........