
मुंबईकरांना झोपेसाठी ‘लोकल’चा आधार
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १७ : मुंबई आणि उपनगरातील लाखो नोकरदार, व्यावसायिकांचा ‘लोकल’शी तसा जिव्हाळ्याचा संबंध. गर्दीच्या वेळेत जिथे लोकलमध्ये जेथे शिरायला जागा नसते, तिथे बसायला जागा मिळणे म्हणजे ‘स्वर्गसुख’ असते. अनेक जण लोकलमध्ये मिळेल तेथे ‘ॲडजस्ट’ करतात आणि ‘डुलकी’ घेतात. दिवसभर कामात थकल्यानंतर लोकलमध्ये अशी डुलकी घ्यायला अनेकांना आवडते. अशाच एका सर्वेक्षणातून मुंबईकर लोकलमधून महिन्याला सरासरी १२ तासांची झोप घेत असल्याचे समोर आले आहे.
१७ मार्च हा दिवस ८८ हून अधिक देशांमध्ये ‘वर्ल्ड स्लीप डे’ म्हणून साजरा केला गेला. या दिवसाच्या निमित्ताने विशेषतः मुंबईत अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. बदललेल्या जीवनशैलीमुळे पुरेशा झोपेची गरज आणि महत्त्व नागरिकांना अजूनही पटत नाही. झोपेच्या अभावाने विविध आजारांना सामोरे जावे लागते. सुदृढ आरोग्यासाठी झोप किती महत्त्वाची आहे व ती न मिळाल्यास काय दुष्परिणाम होतात, याबाबत अपेक्स हॉस्पिटल समूहातर्फे एक कार्यशाळा आयोजित केली होती. या वेळी हॉस्पिटलतर्फे केलेल्या निरीक्षणातून मुंबईकर महिन्याला सरासरी १२ तास झोप लोकलमध्ये घेत असल्याचे सांगण्यात आले.
आरोग्य उत्तम ठेवण्यात हातभार
लोकलने प्रवास करणारे मुंबईकर आठवड्याला सरासरी तीन तास व महिन्याला १२ तास झोप घेतात. थेट पालघर, विरार, डहाणू तसेच कर्जत, कसारा व पनवेल, रसायनी येथून मुंबईत काम-धंद्यानिमित्त येणारे लाखो नागरिक आहेत. या नागरिकांचे दिवसातील पाच ते सात तास प्रवासात जातात. त्यामुळे या नागरिकांची झोप पूर्ण होत नाही; परंतु प्रवासात घेतलेली थोडीशी ‘झोप’ही त्यांचे आरोग्य उत्तम ठेवण्यात हातभार लावत आहे.
१) झोप न येणे अथवा झोप पूर्ण न येणे हे बिघडलेल्या शारीरिक व मानसिक अवस्थेचे पहिले लक्षण आहे. मुंबईत कामानिमित्त लाखो चाकरमानी दोन ते तीन तासांचा प्रवास करून येतात. तसाच घरी परतण्याचा प्रवासही तेवढाच असतो. त्यामुळे प्रवासात झोप घेण्याची सवय मुंबईकरांना लागली आहे व यात काही वावगे नाही.
२) आजमितीला मानसिक नैराश्य, कुटुंबावर वाढत असलेला आर्थिक बोजा, विविध आजारपण व नात्यामध्ये आलेला दुरावा अशा विविध कारणांमुळे निद्रानाशाचा त्रास १० पैकी सहा नागरिकांना होत असतो. कामाच्या गडबडीत जर मुंबईकर आपली थोडी-फार झोप प्रवासामध्ये लोकलमध्ये घेत असतील, तर ही दिलासादायक बाब आहे, असे डॉ. बिन्ही देसाई यांनी सांगितले.
झोप ही मानवी आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. दिवसभर काम करून मेंदूमध्ये अतिरिक्त पदार्थ साठले जातात. झोपण्याच्या क्रियेतून मेंदूद्वारे हे अतिरिक्त अनावश्यक पदार्थ स्वच्छ केले जातात. जर ही प्रक्रिया नीट पार पडली नाही तर ते मेंदूत साचून राहतात आणि त्याचा परिणाम स्मरणशक्तीवर होतो. सामान्य माणसाला दररोज ७-८ तास झोप गरजेची; तर लहान मुलांना १० तास झोप आवश्यक आहे.
- डॉ. बिन्ही देसाई, ईएनटी आणि व्हॉईस सर्जन, लॅरिन्गोलॉजिस्ट