
धीरेंद्र शास्त्त्रींच्या कार्यक्रमाविरोधात याचिका
सकाळी वृत्तसेवा
मुंबई, ता. १८ : मिरा रोडमध्ये बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या कथित दिव्य दरबारविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेतली असून स्थानिक पोलिस ठाण्याला नोटीस बजावली आहे.
ॲड. नितीन सातपुते यांनी शनिवारी (ता. १८) उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. संबंधित दिव्य दरबार भरवण्याला त्यांनी यात आक्षेप घेतला आहे. शास्त्री यांच्या दरबारात काळी जादू आणि मंत्र तंत्र केले जातात, असा आरोप याचिकेत केला आहे. काळी जादू प्रतिबंधक कायद्याचा दाखला याचिकेत देण्यात आला असून अशा प्रकारचे अंधश्रद्धा पसरवणारे कार्यक्रम करण्यासाठी परवानगी देणाऱ्या राज्य सरकारवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शास्त्री यांचा नियोजित कार्यक्रम होऊ नये म्हणून स्थानिक राजकीय पक्षांनीदेखील विविध भूमिका मांडल्या आहेत. यापूर्वी शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता.