
मुंबईच्या हवेचा स्तर ‘समाधानकारक’
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : अवकाळी पाऊस आणि सुटलेली हवा यामुळे मुंबईतील हवेचा स्तर सुधारला असून, हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ‘समाधानकारक’ नोंदवण्यात आला आहे; तर भांडुप, माझगाव, वरळी आणि अंधेरीमध्ये ‘उत्तम’ हवेची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानसोबत प्रदूषण ही कमी झाले आहे. त्यामुळे मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांकही ५६ सह ‘समाधानकारक’ नोंदवण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे मुंबईतील कमाल तापमानात घट झाली आहे. मुंबईतील कमाल तापमान ३१ अंशांपर्यंत खाली आले आहे; तर कुलाबा ३०.८ आणि सांताक्रूझ ३१.६ अंश सेल्सियस नोंद झाली असून तापमानात १ ते २ अंशांची घट झाली आहे. तसेच किमान तापमानातही घट झाली असून, तेथे अनुक्रमे २३.२ आणि २२.४ अंशांची नोंद झाली आहे; तर आर्द्रता ५६ आणि ५८ टक्के इतकी नोंदवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत आज उकाडा जाणवला नाही.
----
उत्तम हवा (एक्यूआय)
भांडुप (४५), माझगाव (३९), वरळी (३७), अंधेरी (४१)
समाधानकारक हवा (एक्यूआय)
कुलाबा (७६), मालाड (५१), बोरिवली (८३), बीकेसी (८८), चेंबूर (५३), नवी मुंबई (५७)