नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

नव्या व्हेरिएंटमुळे कोरोना रुग्णसंख्येत वाढ

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २३ : कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होत असताना राज्यात अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ही वाढ होण्यामागे कोरोनाचा नवा व्हेरिएंट असण्याची, तसेच कोरोना लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा स्तर खालावल्याची शक्यता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

कोरोनाच्या उद्रेकानंतर आतापर्यंत त्याचे अनेक व्हेरिएंट आले आहेत. प्रत्येक व्हेरिएंटच्या वेळी रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसून आली आहे. त्यामुळे सध्या होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या वाढीमागे नवा व्हेरिएंट असण्याची शक्यता आहेत. तसेच राज्यात सर्व नागरिकांनी कोरोनाविरोधी लस घेतल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात यश आले; मात्र लस घेऊन आता साधारणपणे एक ते दीड वर्ष उलटले आहे. त्यामुळे लसीकरणामुळे शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीजचा स्तर हळूहळू खालावत जाऊन ती सुप्तावस्थेत गेली आहेत. कोणताही आजार आल्यास त्यांच्याशी लढा देणाऱ्या पेशींच्या स्मृतीमध्ये असलेल्या अँटीबॉडीज पुन्हा ॲक्टिव्ह होतात. त्याप्रमाणे सध्या सुप्तावस्थेत असलेली कोरोनाच्या अँटीबॉडीजही पुन्हा सज्ज होतील. मात्र नवा व्हेरिएंट असल्याने त्याला ॲक्टिव्ह होण्यास थोडासा वेळ लागण्याची शक्यता आहे.

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी बनवण्यात आलेल्या लसीसाठी ज्या पेशींमधील घटकांचा वापर केला होता, त्या तुलनेत नव्या व्हेरिएंटमध्ये बदल झालेला असल्याने ही अँटीबॉडीज पुन्हा सतर्क होण्यास थोडासा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तोपर्यंत करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र नागरिकांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीजमुळे कोरोनाने यापुढे मृत्यू होण्याचे प्रमाण फारच अल्प असणार आहे, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.


कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये सातत्याने बदल
कोरोनाचा विषाणू त्याच्यामध्ये सातत्याने बदल करत आहे. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांच्या वाढीसाठी त्याचा नवा व्हेरिएंट कारणीभूत असण्याची शक्यता आहे. तसेच कोरोना लस घेऊनही नागरिकांना बराच कालावधी झाला आहे. त्यामुळे नव्या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी अँटीबॉडीज काही कालावधीसाठी शिथिल झालेली असू शकते. त्याचा परिणाम कोरोना रुग्णसंख्या वाढीवर दिसून येण्याची शक्यता केईएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी केली.

सध्या वाढत असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला घाबरण्याची आवश्यकता नसून योग्य काळजी घेण्याची गरज आहे. ज्या नागरिकांना दीर्घ आजार आहेत, ज्येष्ठ नागरिक, फुफ्फुस व श्वसनाचे आजार असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
- डॉ. भरत जगियासी, सचिव,
इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन (मुंबई शाखा)

काय काळजी घ्याल
- मास्क वापरा
- गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा
- हात साबणाने स्वच्छ धुवा
- भरपूर पाणी प्या
- शिंकताना व खोकताना तोंडावर व नाकावर रुमाल धरा
डॉक्टरांचा सल्ला घ्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com