
सहकारी गृहनिर्माण क्षेत्राची मुंबईत दोन दिवसीय परिषद
मुंबई, ता. २७ : सोमय्या मैदानावर संपूर्ण मुंबईतील सहकारी गृहनिर्माण क्षेत्राची परिषद २९ व ३० एप्रिल रोजी होणार असल्याची घोषणा भाजप विधान परिषद गटनेते आमदार आणि मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर यांनी केली आहे. आज हौसिंग सोसायट्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांवर उत्तर कसे काढता येईल, या प्रमुख उद्देशाने या परिषदेत चर्चा, मार्गदर्शन होईल, असे दरेकर म्हणाले. आजचा महत्त्वाचा विषय म्हणजे ‘सेल्फ रीडेव्हलपमेंट’. आधी हा विषय अशक्य वाटत होता, मात्र आता असे अनेक प्रकल्प यशस्वी होताना दिसत आहेत. मुंबई बँकेने अशा अनेक सोसायट्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. आता नव्या सरकारने यासाठी एक खिडकी योजना आणण्याचेही सूतोवाचे केले आहे. स्वयंपुनर्विकासासंदर्भात सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांना या परिषदेत जरूर ते सर्व मार्गदर्शन केले जाईल, असेही दरेकर यांनी सांगितले.