
मुंबईत आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन
मुंबई, ता. २९ : राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षात लागू हेाणारे शैक्षणिक धोरण, तसेच साहित्य आणि संस्कृतीच्या क्षेत्रातील बदलणारे नवे आयाम आदींवर चर्चा घडविण्यासाठी मुंबईत रविवारी (ता. २) आठवे आंबेडकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘विकास प्रबोधिनी’ या संस्थेतर्फे आयोजित हे संमेलन भांडुप पूर्वेतील शिवाई विद्यालयात पार पडणार आहे.
संमेलनाला साहित्यिका आशालता कांबळे अध्यक्षा; तर उद्घाटक म्हणून सद्धम्म पत्रिकेचे संस्थापक-संपादक प्रा. आनंद देवडेकर असतील. संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. श्रीकृष्ण टोबरे हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या ‘कथाकथन’ परिसंवादात प्रा. सिंधुताई रामटेके सुंदर कथाकथन करतील. या संमेलनात ‘नवीन शैक्षणिक धोरणाचे दुरगामी परिणाम’ या विषयावरील परिसंवादात प्रा. विजय मोहिते, पत्रकार भास्कर सरोदे सहभागी होतील; तर ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विचारवंत शुद्धोदन आहेर हे या परिसंवादाचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.
‘भारतीय लोकशाही काल, आज आणि उद्या’ या दुसऱ्या परिसंवादात प्रा. सुमेध पारवे, प्रा. गोविंद गायकवाड आदी विचार मांडतील. अखेरच्या सत्रात कवी अरुण म्हात्रे यांच्या उपस्थितीत कविसंमेलन होईल. यामध्ये कवी बबन सरोदे, राजरत्न राजगुरू, नीलाताई वाघमारे, उत्तम भगत, कवी दीप, मिलिंद जाधव, वर्षा भिसे, सुरेखा पैठणे, वैभवी अडसूळ, वृषाली माने, हरेश कुलकर्णी आदी कवी सहभागी होणार आहेत.