
राज्यात ‘एच३एन२’चे आठ नवे रुग्ण
मुंबई, ता. २९ : राज्यामध्ये बुधवारी ‘एच३ एन२’च्या आठ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे ‘एच३एन२’च्या रुग्णांची संख्या ३४१ इतकी झाली आहे. सध्या राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये ८९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात १ जानेवारीपासून आतापर्यंत इन्फ्ल्युएंझाचे ३ लाख ५३ हजार ११६ संशयित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ‘एच१एन१’चे ४४२; तर ‘एच३एन२’चे ३४१ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. इन्फ्ल्यूएंझा रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये तसेच रुग्णालयांमध्ये विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तिथे आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा ठेवण्यात आला असून राज्यातील सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.