मणक्याच्या क्षयरोगापासून तरुणीची सुटका

मणक्याच्या क्षयरोगापासून तरुणीची सुटका

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : मणक्याच्या क्षयरोगाने ग्रासलेल्या व अंथरुणाला खिळलेल्या २२ वर्षे वयाच्या तरुणीवर दुर्मिळ स्वरूपाची शस्त्रक्रिया करून तिला पूर्णपणे बरे करण्याची किमया मुंबई महापालिकेच्‍या विष्‍णूप्रसाद नंदराय (व्ही. एन.) देसाई रुग्‍णालयाने स्पाइन क्लिनिकच्या सहकार्याने साध्य करून दाखवली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्‍या दहा दिवसांत ही तरुणी किमान आधार घेऊन चालू लागली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना देसाई रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हरबंससिंग बावा यांनी सांगितले की, मणक्‍याच्‍या व्‍याधीने ग्रस्‍त एक २२ वर्षीय तरुणी मागील आठवड्यात व्ही. एन. देसाई सर्वसाधारण रुग्णालयात दाखल झाली. या महिलेला चालता येत नव्‍हते, पायांची हालचाल करता येत नव्‍हती. महिनाभर ती अंथरुणास खिळून होती. त्यामुळे मूत्राशय आणि ओटीपोटावरदेखील परिणाम झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ढोंगी वैद्याकडून झालेल्या बनावट उपचारांमुळे या तरुणीचा हा आजार बळावला होता.

असे झाले उपचार
अगदी तरुण वयात आजाराने बेजार झालेल्या या तरुणीच्या आजाराचे संपूर्ण निदान करण्यासाठी एम.आर.आय. तपासणी करण्यात आली. तपासणीतील निष्कर्षानुसार, या तरुणीला मणक्याचा क्षयरोग झाल्‍याचे तसेच त्यामुळे मणक्यातील विविध नसांवर दाब निर्माण झाल्याचे आढळले. एकंदरीत, आजाराने धारण केलेले तीव्र रूप हे क्वचित आढळणारे असे होते. या आजारातून तरुणीला संपूर्णपणे बरे करण्यासाठी शस्त्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय समोर होता.

स्पाइन फाऊंडेशनची मदत
रुग्णाची आर्थिक स्थिती साधारण स्वरूपाची होती. अशा स्थितीत स्पाइन फाऊंडेशनने, रुग्णालयात कार्यरत स्पाइन क्लिनिकच्या माध्यमातून सहकार्याचा हात पुढे केला. व्ही. एन. देसाई रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक तसेच स्पाइन क्लिनिकचे रुग्णालयातील मानद वैद्यकीय सल्लागार, मणक्यांच्या विकारातील प्रसिद्ध वैद्यकीयतज्ज्ञ डॉ. शेखर भोजराज, डॉ. प्रेमिक नागद यांनी संयुक्तपणे ही अवघड शस्त्रक्रिया करण्याचे निश्चित केले. त्यानंतर, या तरुणीच्या मणक्यावर डिकॉम्प्रेशन व हार्टशील फिक्सेशन शस्‍त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी ही तरुणी स्‍वत:च्‍या पायावर उभी राहू शकली, तर अवघ्‍या दहा दिवसांत ती कमीत कमी आधार घेऊन चालू लागली. रुग्णाचे मूत्राशय व ओटीपोट पूर्ववत झाले आहे. ही रुग्ण आजारातून पूर्णपणे बरी होऊन चालू लागली.

तज्‍ज्ञांकडूनच उपचार हवेत
पाठीचे विशेषतः मणक्याचे कोणतेही विकार, दुखणे असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा तातडीने सल्ला घ्यावा. स्थानिक भोंदू लोकांकडून उपचार घेऊ नयेत; अन्यथा आजार बळावतात, त्यातून दुर्धर स्थिती उद्भवू शकते, असा इशारा यानिमित्ताने व्ही. एन. देसाई महापालिका रुग्णालयाने दिला आहे.

३७ हजार यशस्‍वी उपचार
व्ही. एन. देसाई रुग्णालयातील स्पाईन क्लिनिकमध्ये २००९ पासून आजवर मणक्‍याच्‍या ३७ हजार रुग्णांवर यशस्‍वी उपचार, तर १ हजाराहून अधिक शस्त्रक्रियादेखील यशस्वी झाल्‍या आहेत. ऑसिपिटो सर्व्हायकल फ्युजन, टॅन्डम, सर्व्हायकल, डिफॉर्मेटी करेक्शन यांसारख्या जोखमीच्या शस्त्रक्रियांचा यात समावेश आहे.

नियमित बाह्यरुग्ण विभाग, वैद्यकीय सल्ला, तपासणी, शस्त्रक्रिया, त्यानंतरची वैद्यकीय काळजी आणि पुनर्वसन या सगळ्या आरोग्य सेवा सर्वोत्कृष्ट पद्धतीने, कमीतकमी खर्चात आणि तेही मणक्याच्या शल्यचिकित्सकांच्या संपूर्ण देखरेखीखाली पुरविल्या जातात. ज्या-ज्या वेळी आवश्यक आहे तेव्हा, महानगरपालिका आणि स्पाइन क्लिनिक मिळून विविध सरकारी आरोग्य योजनांच्या माध्यमातून रुग्णांना लाभ पुरवतात तसेच समाजसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वतः निधी उभा करतात. परिणामी गरजू रुग्णांना उत्कृष्ट उपचार तर मिळतातच, आर्थिक दिलासादेखील मिळतो.
- डॉ. हरबंससिंग बावा, वैद्यकीय अधीक्षक, व्ही. एन. देसाई रुग्‍णालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com