नालेसफाई ५६ टक्के पूर्ण!

नालेसफाई ५६ टक्के पूर्ण!

मुंबई, ता. २ : पालिकेतर्फे मुंबई शहर आणि उपनगरांतील पावसाळापूर्व नालेसफाईला वेग देण्यात आला आहे. लहान-मोठ्या नाल्यांतून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. यंदा पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ८२ हजार ४२६ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट पालिकेने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ५ लाख ५८ हजार ८७७ टन म्हणजेच ५६.८९ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. पावसाळ्याच्या आधी म्हणजे ३१ मेपूर्वी नालेसफाई पूर्ण केली जाईल, अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिली.

मुंबईत दरवर्षी पावसाचे प्रत्यक्ष आगमन होण्यापूर्वी महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या माध्यमातून महानगरातील मोठ्या नाल्यांमधून गाळ काढला जातो. विभाग कार्यालय स्तरावर लहान नालेसफाईंची कामे केली जातात. परिणामी पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा होण्यास मदत मिळते. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता करताना नाल्यांमधून किती गाळ उपसणे आवश्यक आहे, याचा अभ्यास करून दरवर्षी त्याबाबतचे उद्दिष्ट निश्चित केले जाते. त्यासाठी महानगरातील पर्जन्यमान आणि पावसाच्या तीव्रतेचा अनुभव लक्षात घेतला जातो. यंदा ९ लाख ८२ हजार ४२६ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करून सफाई कामाला मार्च महिन्‍यात प्रारंभ करण्यात आला. आतापर्यंत निर्धारित उद्दिष्टाच्या ५६.८९ टक्के गाळ काढण्‍यात आला आहे. मार्चच्या पाहिल्या आठवड्यात कामे सुरू झाल्यानंतर शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे अशा तीनही विभागांमध्ये ती जलदगतीने करण्यात येत आहेत.

मुंबईतील सर्व लहान नाले मिळून ३ लाख ६८ हजार १७७ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत २ लाख १८ हजार ५९८ टन गाळ काढण्यात आला आहे. हे प्रमाण ५९.३७ टक्‍के आहे. महामार्गांलगतच्‍या नाल्‍यांमधून एकूण ४८ हजार ५०२ टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २२ हजार ८७६ टन गाळ काढण्यात आला असून हे प्रमाण ४७.१७ टक्‍के आहे.

यंदा अटी-शर्ती कडक
- योग्यरीत्या गाळ काढला जावा म्हणून कामावर देखरेख ठेवण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंत्राटांमध्ये यंदा अधिक कडक अटी व शर्तींचा समावेश केला आहे. प्रत्येक कामासाठी व्हिडीओ क्लीप आणि छायाचित्रे सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
- काम सुरू होण्यापूर्वी, ते प्रत्यक्ष सुरू असताना आणि संपल्यानंतर अशा तिन्ही टप्प्यांमध्ये तारीख, वेळ, अक्षांश-रेखांश (रिअलटाइम जिओ टॅग) इत्यादींसह चित्रफीत व छायाचित्रे तयार करून ती सॉफ्टवेअरवर अपलोड करणे कंत्राटदारांना बंधनकारक करण्यात आले आहे.
- कामाचे छायाचित्रण व चित्रफीत तयार करताना दररोज नाल्यांमधून गाळ काढल्यानंतर तो ठेवल्याची जागा, नाल्याकाठची दैनंदिन छायाचित्रे, गाळ डंपरमध्ये भरण्यापूर्वी तो पूर्ण रिकामा असल्याचे दर्शवणारे चित्रण, डंपरमध्ये गाळ भरतानाचे आणि नंतरचे चित्रण, गाळ वाहून नेल्यानंतर क्षेपणभूमीवर आलेल्या व जाणाऱ्या डंपर वाहनांच्या क्रमांकाची आणि वेळेची नोंद, क्षेपणभूमीवर येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे इत्यादी सर्व जबाबदारी कंत्राटदारांवर सोपवण्यात आली आहे.

आतापर्यंत काढण्यात आलेला गाळ
शहर
उद्दिष्ट ः ३७,९४६ टन
नालेसफाई ः २१,८११ टन
प्रमाण ः ५७.४८%

पूर्व उपनगर
उद्दिष्ट : १,१७,६९२ टन
नालेसफाई : ८०,३५६ टन
प्रमाण ः ६८.२८%

पश्चिम उपनगर
उद्दिष्ट ः १,९३,९३३ टन
नालेसफाई ः १,२३,४०१ टन
प्रमाण ः ६३.६३%

मिठी नदी
उद्दिष्ट ः २,१६,१७४ टन
सफाई ः ९१,८३२ टन
प्रमाण ः ४२.४८%

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com