
इकबाल यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळला
मुंबई, ता. २७ : प्रसिद्ध कवी, गीतकार मोहम्मद इकबाल उर्फ अल्लामा इकबाल यांचा धडा दिल्ली विद्यापीठाच्या बीएच्या अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने हा धडा वगळण्यासाठीचा ठराव मंजूर केला आहे. या ठरावाविरोधात देशभर प्रतिक्रिया उमटत आहेत.
नवीन अभ्यासक्रमाच्या नावाखाली हा बदल करण्यात आल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. बीएच्या सहाव्या सेमिस्टरच्या अभ्यासक्रमात एकूण ११ धडे आहेत. मॉडर्न इंडियन पॉलिटिकल थॉट नावाच्या पाठात राजा राममोहन रॉय, पंडिता रमाबाई, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांच्या विचारांशी संबंधित प्रकरणे या अभ्यासक्रमाचा भाग आहेत. यामध्ये ‘इक्बाल कम्युनिटी’ नावाचा एक धडा आहे. तो हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. हा धडा काढण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेला माहिती दिली जाईल. ती अंतिम निर्णय घेईल, असे विद्यापीठाच्या अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी ९ जून रोजी परिषदेची बैठक होणार आहे. इकबाल यांचा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यासाठी शुक्रवारी सुरू झालेली अकॅडमिक कौन्सिलची बैठक शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. परिषदेच्या १०० पैकी ५ सदस्यांनी अभ्यासक्रम बदलण्याच्या प्रस्तावाला विरोध केला. या सदस्यांनी या निर्णयाला विभाजनवादी असे म्हटले आहे.
---
कोण आहेत इकबाल
सियालकोट येथे १८७७ मध्ये जन्मलेले अल्लामा मुहम्मद इकबाल यांना पाकिस्तानचे राष्ट्र कवी म्हटले जाते. ते उर्दू भाषेत लिहिणारे एक ख्यातनाम कवी होते. ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ हे सुप्रसिद्ध गाणे त्यांचेच आहे. पण त्यानंतर पाकिस्तानच्या निर्मितीची कल्पना करणारे म्हणून त्यांना ओळखले गेले. अर्थात त्यांनी पाकिस्तानची निर्मिती पाहिली नाही. १९३८ मध्येच त्यांचे निधन झाले.