बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फायली झाल्या गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फायली झाल्या गायब
बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फायली झाल्या गायब

बांधकाम विभागाच्या कार्यालयातून फायली झाल्या गायब

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३० ः महापालिकेच्या वांद्रे येथील बांधकाम प्रपोजल विभागाच्या इमारतीमधून विविध फायली गायब झाल्याचे समोर आले आहे. काही रहिवाशांनी माहिती अधिकारात याबाबत विचारणा केली असता त्यांना फायली गायब झाल्याचे सांगण्यात आले. याविरोधात ॲड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी महापालिकेकडे तक्रार दाखल केली आहे.
वांद्रे पश्चिम जुन्या कार्यालयातून हजारो फायली गहाळ झाल्याबाबत आमदार अमित साटम यांनी विधानसभेत ५० हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला होता. राज्य विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करूनही परिस्थिती सुधारलेली नाही. इमारत प्रस्ताव विभागाने ठेवलेल्या रेकॉर्डमधून फाईल अजूनही गायब आहेत. याबाबत वॉचडॉग फाऊंडेशनचे प्रमुख गॉडफ्रे पिमेंटा यांनी आक्षेप नोंदवला आहे. ‘संबंधित अधिकाऱ्‍यांची ही गंभीर चूक आहे. कारण गहाळ झालेल्या फायली या इमारतीचे वैधानिक रेकॉर्ड आणि कायदेशीर कारवाईसाठी महत्त्वपूर्ण आहेत. फायली गहाळ झाल्यामुळे रेकॉर्डमध्ये केवळ छेडछाड केली जात नाही तर अनेकदा आर्थिक फायद्यासाठी अधिकारी किंवा विकसकांकडून त्याचा गैरवापर केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये इमारत प्रस्ताव विभागाच्या काही अधिकाऱ्यांचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी,’ अशी मागणी पिमेंटा यांनी केली आहे. याबाबत पालिकेच्या बांधकाम विभागाकडे संपर्क केला असता तो हाऊ शकला नाही.
...
पोलिसांत तक्रार करणे गरजेचे!
‘एखाद्या इमारतीच्या संबंधीचे कागदपत्र गहाळ झाले असले तरी इमारतीच्या वास्तुविशारद/मालकांकडून कागदपत्रे मागवून त्याची पुनर्रचना केली जाऊ शकते. शिवाय गहाळ झालेल्या फायलींबाबत पोलिसांत तक्रार करणेदेखील गरजेचे आहे. इमारतींची पाहणी करून ती नियमानुसार आहे किंवा नाही हेही तपासले जाऊ शकते,’ असे पिमेंटा यांनी म्हटले आहे.