
आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात
मुंबई, ता. ३१ : शिक्षणाचा हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या २५ टक्के प्रवेश प्रक्रियेच्या प्रतीक्षा यादीतील बालकांचे ३० मेपासून प्रवेश सुरू झाले आहेत. प्रतीक्षा यादीतील बालकाच्या पालकांनी त्यांच्या लॉगीनमधून प्रवेशपत्राची (अलॉटमेंट लेटर) प्रिंट काढावी. हे प्रवेश पत्र व आवश्यक कागदपत्रे पडताळणी समितीकडून १२ जूनपर्यंत तपासणी करून आपल्या बालकांचा ऑनलाईन प्रवेश निश्चित करावा. प्रवेश निश्चित झाल्याची पावती घेऊन शाळेमध्ये जावे आणि प्रवेश घ्यावा, असे आवाहन महापालिका शिक्षण खात्याने केले आहे.
आरटीईअंतर्गत २०२३-२४ या शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन सोडत ५ एप्रिल रोजी काढण्यात आली होती. मुंबई पालिका क्षेत्रामध्ये निवड यादीतील विद्यार्थी संख्या ५ हजार ६९०, तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी संख्या ४ हजार ३९८ इतकी आहे. निवड यादीतील ३ हजार ३७२ विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित झाले आहेत; तर ५८ विद्यार्थ्यांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. २ हजार २६० पालकांनी पडताळणी समितीशी / शाळेशी संपर्क साधलेला नाही. आरटीई अंतर्गत वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, राजू तडवी यांनी केले आहे.