
दुर्मिळ आजाराशी लढत मिळवले ८० टक्के
मुंबई, ता. २ : अत्यंत वेदनादायी ‘स्यूडोआकॉन्ड्रोप्लासिया’ नावाचा दुर्मिळ आजार, त्यामुळे चालणे, बसणेही कठीण असताना केवळ जिद्दीच्या बळावर नवी मुंबईतील तनिष्का संतोष या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८०.८ टक्के गुण मिळवत सर्वांची वाहवा मिळवली आहे. तनिष्का वाशी येथील फादर अग्नेल शाळेची विद्यार्थिनी आहे. इंग्रजीत तिला सर्वाधिक ८२ गुण मिळाले आहेत. परीक्षेला बसता येत नसल्याने रायटरची मदत घेतली होती; पण आपणच गणिताचा पेपर सोडवला असता तर अधिक गुण मिळाले असते, असे तिने सांगितले.
तनिष्का ही स्यूडोआकॉन्ड्रोप्लासिया या अत्यंत दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे. जगातील ३० हजार लोकांच्या मागे एखादी व्यक्ती अशा आजाराने बाधित असते. या आजारात हाडांची वाढ होत नाही. त्यामुळे एकूणच शरीराच्या वाढीवर परिणाम होतो. तनिष्काचेही तसेच झाले आहे. तिला चालताना १० पावले चालल्यास थांबावे लागते, काही मिनिटेही बसता येत नाही, रात्री लवकर झोपू शकत नाही, त्यातच दोन वेळा ऑपरेशन झालेले असताना तिने जिद्दीने अभ्यास करून दहावीत यश मिळवले असल्याचे आई मंजिरी संतोष हिने सांगितले. तनिष्काच्या आजारामुळे तिला अनेकदा शाळा सोडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु तिची प्रबळ इच्छाशक्ती असल्याने तिने दहावीपर्यंत येऊन हे यश मिळवल्याचेही मंजिरी संतोष म्हणाल्या. तसेच यासाठी तिच्या शिक्षकांनी आणि शाळेनेही कायमच सहकार्य केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.