
सोमवारपासून राज्यभर संपाची हाक
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २ : नेत्रशल्य चिकित्सा विभाग प्रमुख डॉ. रागिणी पारेख आणि डॉ. तात्याराव लहाने यांच्याकडून होत असलेल्या छळाविरोधात जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. संपामुळे रुग्णांचे हाल होत असताना आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर निवासी डॉक्टर ठाम आहेत. सोमवारपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये संप पुकारण्यात येईल, असे पत्र जे. जे. मार्डच्या निवासी डॉक्टरांकडून वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांना पाठविण्यात आले आहे.
जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी त्यांच्या मागण्यांसाठी बुधवारी (ता. ३१) सायंकाळपासून पुकारलेला संप शुक्रवारी तिसऱ्या दिवशीही सुरू होता. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी संप मागे घेण्याबाबत निवासी डॉक्टरांशी चर्चा केली; मात्र निवासी डॉक्टरांनी मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नसल्याची भूमिका ठाम ठेवली. त्यामुळे शुक्रवारी जे. जे. रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेवर परिणाम झाला; तर रुग्णालयातील विविध विभागांतील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. ज्यांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या, अशा रुग्णांना पुन्हा घरी सोडण्यात आले आहे. प्रत्येक कक्षातून किमान १० ते १५ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. या रुग्णांना संप संपल्यावर परत येण्यास सांगण्यात आले आहे.