
हज यात्रेच्या शुल्क तफावतीविरोधात याचिका
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३ : आगामी हज यात्रेसाठी मुंबई आणि नागपूर येथील शुल्कात तफावत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात पाचहून अधिक याचिका दाखल झाल्या आहेत.
केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक विभागाने हज यात्रेकरूंसाठी काही दिवसांपूर्वी परिपत्रक काढले आहे. यामध्ये विविध शहरांतून येणाऱ्या यात्रेकरूंसाठी शुल्क निश्चिती करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि नागपूर येथील शुल्कात तुलनात्मक ६२ हजार रुपयांचा फरक आहे. जे नागरिक नागपूरमधून येतील त्यांना ६२ हजार रुपये मुंबईच्या तुलनेत जादा द्यावे लागणार आहेत. यामुळे काही यात्रेकरूंनी मुंबईमधून येण्याची तयारी दर्शवली आहे, तर काही जणांनी या परिपत्रकाला विरोध केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये ही याचिका करण्यात आली आहे. दरम्यान न्या. एम डब्ल्यू चांदवानी यांनी याचिकेवर सुनावणी घेऊन केंद्र आणि राज्य सरकारसह हज समितीला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच नागपूरऐवजी मुंबईमधून नोंदणी करण्याबाबत विचारणा केली आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्येही या प्रकरची याचिका दाखल झाली आहे. मुंबईमधील शुल्क ३,०३,००० रुपये, नागपुरात ३,६७,०००, तर औरंगाबादमध्ये ३,९२,००० रुपये आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे.