
कीटकनाशक विभागात १२१ पदे रिक्त
मुंबई, ता. ५ ः कीटकनाशक विभागाच्या आस्थापनेवरील १२१ महत्त्वाची पदे सध्या रिक्त आहेत. त्यात वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता, कीटक संकलक आणि प्रतिवेदन वाहक पदांचा समावेश आहे. रिक्त असलेली पदे पदोन्नतीने तात्काळ भरण्यात यावीत, अशी मागणी दि म्युनिसिपल युनियनने केली आहे. रिक्त पदे न भरल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनेने दिला आहे.
युनियन आपल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यासंबंधी कीटकनाशक अधिकाऱ्यांसमवेत बैठकही झाली. बैठकीत सर्व पदे कीटकनाशक विभागातील कामगार संवर्गाची पदोन्नतीची आहेत. ती न भरल्यामुळे संबंधित कामगारांचे खूपच आर्थिक व सामाजिक नुकसान झाले असल्याकडे कीटकनाशक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून पावसाळा सुरू होण्यापूर्वी ती भरावीत, अशी विनंती करण्यात आली होती. सर्व पदे पावसाळ्यापूर्वी भरण्यात येतील, असे आश्वासन कीटकनाशक अधिकाऱ्यांनी दिले होते; परंतु दोन महिन्यांहून अधिक काळ होऊनही सदर पदावर कामगारांना पदोन्नती देण्यात आलेली नाही. त्यामुळे कामगारांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला असल्याकडे संघटनेने प्रशासनाचे लक्ष वेधले. रिक्त पदे १५ जूनपूर्वी पदोन्नतीने न भरल्यास १६ जूनपासून कीटकनाशक अधिकारी यांच्या अधिपत्याखालील सर्व कामगार प्रखर आंदोलन करतील, असा इशारा दि म्युनिसिपल युनियनचे सरचिटणीस रमाकांत बने यांनी दिला आहे.