आयटी नफावसुलीमुळे निर्देशांक स्थिर

आयटी नफावसुलीमुळे निर्देशांक स्थिर

मुंबई, ता. ६ ः आयटी क्षेत्राच्या शेअरमध्ये आज झालेल्या विक्रीमुळे निर्देशांकांना फारशी कमाई करता आली नाही व ते जवळपास स्थिरच राहिले. सेन्सेक्स व निफ्टी आज जेमतेम पाच अंश वाढले.
आयटी क्षेत्राला पुढील संकेत कमकुवत दिसत असल्याच्या शक्यतेमुळे आज आयटी क्षेत्रातील शेअरमध्ये नफावसुली झाली. त्यामुळे सकाळी चांगल्या सुरुवातीनंतर निर्देशांक घसरले होते. शेवटच्या अर्ध्या तासात पुन्हा खरेदी झाल्यामुळे निर्देशांक कसेतरी सावरले. दिवसअखेरीस ५.४१ अंश वाढलेला सेन्सेक्स ६२,७९२.८८ अंशांवर तर ५.१५ अंश वाढलेला निफ्टी १८,५९९ अंशावर स्थिरावला. आयटी शेअरची विक्री होत असताना बांधकाम व्यवसाय, वाहन निर्मिती आणि बँका यांच्या शेअरमध्ये खरेदी झाली. त्यातच रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण समितीची तीन दिवस चालणारी बैठक आजपासून सुरू झाल्यामुळेही गुंतवणूकदार सावध होते. अमेरिकेचे आणि जर्मनीचे संरक्षण मंत्री भारतात असून संरक्षण क्षेत्रातील भागीदारीसंदर्भात काही निर्णय अपेक्षित आहेत. त्यामुळे आज संरक्षण क्षेत्राचे साहित्य निर्माण करणारा कंपन्यांवर सर्वांचे लक्ष होते. निफ्टी १८,५०० ते १८,६०० यादरम्यान फिरत होता, तर सेन्सेक्सही ६२,५०० ते ६२,८०० याच दरम्यान वर-खाली होत होता. निर्देशांकांना वरच्या पातळीवर प्रतिरोध जाणवत असून गेले तीन दिवस परदेशी वित्तसंस्थांनीही विक्री केल्यामुळे नफा मर्यादित राहिल्याचे तज्ज्ञ दाखवून देत आहेत.
...
चढउतार असे
सेन्सेक्समध्ये आज अल्ट्राटेक सिमेंट तीन टक्के वाढला तर ॲक्सिस बँक आणि कोटक बँक दोन टक्के वाढला. टाटा मोटर, मारुती दीड टक्का तर महिंद्र आणि महिंद्र, बजाज फिन्सर्व्ह, बजाज फायनान्स, टायटन एक टक्का वाढले. आज आयटी क्षेत्राचे शेअर जास्त घसरले होते. टेक महिंद्र आणि इन्फोसिस दोन टक्के, टीसीएस पावणेदोन टक्के तर विप्रो, एचसीएल टेक एक टक्का घसरला.
...
आता पतधोरण समितीच्या बैठकीनंतर रिझर्व्ह बँकेच्या निष्कर्षांवर सर्वांचे लक्ष राहील. सध्या तरी व्याज दरवाढ थांबण्याची अपेक्षा आहे.
- विनोद नायर, जिओजित फायनान्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com