मुलुंडमधील उदंचन केंद्र लवकरच बंद

मुलुंडमधील उदंचन केंद्र लवकरच बंद

मुंबई, ता. ६ ः पूर्व उपनगरामधील टी विभागातील मुलुंडमधील हरी ओम नगर बीयूडीपी उदंचन केंद्र बंद करण्यात येणार आहे. तेथील काम भांडुपमधील उदंचन केंद्रामध्ये केले जाणार आहे. त्या केंद्रापर्यंत विविध आकाराच्या आवश्यक मलनि:सारण वाहिन्या चरविरहित बोगदा पद्धतीने (मायक्रो टनेलिंग) टाकण्यात येणार आहेत. त्यामुळे हरी ओम नगर, म्हाडा कॉलनी आणि सभोवतालच्या परिसरातील रहिवाशांना त्याचा फायदा होईल. पालिका त्यावर सुमारे १२२ कोटी रुपये खर्च करत आहे.

हरी ओम नगर बीयूडीपी उदंचन केंद्र तोडले जाणार आहे. त्यानंतर तेथून भांडुप उदंचन केंद्रापर्यंत ८००, १२००, १४०० व १८०० मिमी व्यासाच्या मलनिःसारण वाहिन्या मायक्रो टनेलिंग पद्धतीने टाकण्यात येणार आहेत. भविष्यकालीन गरजा भागवण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या मलनिःसारण वाहिन्यांचे आकारमान वाढवणे व जिथे त्या नाहीत तिथे नव्याने टाकणे, अशी कामे केली जात आहेत. महामार्ग व रेल्वेमार्गाच्या खालून मलनिःसारण वाहिन्या टाकण्यासाठी मायक्रो टनेलिंग तंत्रज्ञान कार्यान्वित केले जात आहे. त्या कामाकरिता पालिकेने १२२,९६,७८,८४३ इतक्या रकमेचे कार्यालयीन अंदाजपत्रक तयार करून ई-निविदा मागवल्या आहेत. त्यासाठी मे. आरपीएम इन्फ्राप्रोजेक्ट, मे. जिप्सम स्ट्रक्चरल इंडिया आणि मे. मिशिगन इंजिनिअर्स अशा एकूण तीन निविदाकारांच्या निविदा आल्या आहेत. सर्वांत कमी निविदा असलेल्या जिप्सम यांची पालिकेने निवड केली आहे.

असे असेल तंत्रत्रान
- मायक्रो टनेलिंग आणि पाईप जॅकिंग म्हणजे अतिशय रहदारीच्या रस्त्यांमधून आणि रेल्वे, महामार्ग व अरुंद रस्त्याखालून जमिनीवरील भागाला आणि केबल व इतर सेवांना अडथळा न आणता वाहिन्या टाकण्याची प्रगत पद्धत आहे.
- काम करण्यासाठी उपलब्ध जागा अत्यंत मर्यादित असलेल्या आणि रहदारीने गजबजलेल्या रस्त्यावर वाहनांच्या वाहतुकीला कमीत कमी अडथळे व पादचाऱ्यांची कमीत कमी गैरसोय करून रस्त्याखालून मलनिःसारण वाहिनी टाकण्यासाठी मायक्रोटनेलिंग पद्धत उपयुक्त आहे. त्यामध्ये ‘लेझर गाईडेड आणि रिमोट कंट्रोल्ड टनेलिंग शिल्ड’ वापरून बोगदा खोदण्याचे काम व पाईप जॅकिंग करण्यात येते.
- मायक्रो टनेलिंग पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात मलनिःसारण वाहिन्या टाकण्याचे काम करणारे मुंबई देशातील पहिले शहर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com