हैदराबादचा वाविलाला रेड्डी ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’मध्ये देशात पहिला

हैदराबादचा वाविलाला रेड्डी ‘जेईई अ‍ॅडव्हान्स्ड’मध्ये देशात पहिला

मुंबई, ता. १८ ः देशातील आयआयटींमध्ये उपलब्ध असलेल्या अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी महत्त्वाच्या असलेल्या जेईई अ‍ॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल आज रविवारी जाहीर करण्यात आला. देशभरातील ४३ हजार ७७३ विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले. आयआयटी हैदराबाद विभागातील विद्यार्थी वाविलाला चिदविलास ऊर्फ व्ही. सी. रेड्डी ३६० पैकी ३४१ गुण मिळवून देशात प्रथम आला. नायाकांती नागा भाव्याश्री हिने ३६० पैकी २९८ गुण मिळवत मुलींमधून पहिली येण्याचा मान मिळवला. देशात ती ५६ व्या क्रमांकावर असून तीही आयआयटी हैदराबादची विद्यार्थिनी आहे.

देशभरात यंदा आयआयटी गुवाहाटीतर्फे जेईई अ‍ॅडव्हान्स्ड घेण्यात आली होतील. परीक्षेला एक लाख ८० हजार २७२ विद्यार्थी बसले होते. त्यांपैकी ४३ हजार ७७३ परीक्षार्थी पात्र ठरले. त्यात सात हजार ५०९ मुलींचा समावेश आहे. आयआयटी दिल्लीअंतर्गत नऊ हजार २९०, आयआयटी गुवाहाटीअंतर्गत दोन हजार ३९५, आयआयटी हैदराबादअंतर्गत १० हजार ४३२, आयआयटी कानपूरअंतर्गत चार हजार ५८२, आयआयटी खरगपूरअंतर्गत चार हजार ६१८ आणि आयआयटी रुरकीअंतर्गत चार हजार ९९९ परीक्षार्थी पात्र ठरले.

आयआयटी मुंबईतून ३१ हजार ७८८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील २९ हजार ७५८ विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यातील ७,९५७ विद्यार्थी पात्र ठरलेत. देशातील टाॅप दहा विद्यार्थ्यांच्या यादीत मुंबईतील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही. टाॅप १०० मध्ये मात्र २२ विद्यार्थ्यांनी स्थान मिळविले आहे. आयआयटी मुंबई विभागातील पहिल्या पाच स्थानी उज्ज्वल शंकर (सीआरएल ११), युवराज गुप्ता (१३), चैतन्य माहेश्वरी (१५), जस्त्य जरीवाला (२४) आणि सुमेध एस. एस. (३७) यांचा समावेश आहे. मुलींमध्ये आदिती सिंगने पहिला क्रमांक मिळवला. दुसरीकडे देशातील टाॅप १० टाॅपर्समधील सहा विद्यार्थी तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील आहेत.

दरम्यान, यंदा निगेटिव्ह मार्किंग कमी असल्याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ झाली आहे. देशभरातील २३ आयआयटींमधील प्रवेशासाठी यंदा ४३ हजार ७७३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. गेल्या वर्षी सहा हजार ५१६ मुली पात्र ठरल्या होत्या. यंदा सात हजार ५०९ मुली पात्र ठरल्या आहेत. गेल्या वर्षी एक लाख ५५ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षा दिली. त्यांपैकी ४० हजार ७१२ विद्यार्थी पात्र ठरले. यंदा ही संख्या वाढून ४३ हजार ७७३ एवढी झाली आहे.
--
जेईई अ‍ॅडव्हान्स्डचे टाॅप १० विद्यार्थी
- वाविलाला चिदविलास रेड्डी (हैदराबाद)
- रमेश सूर्य थेजा (हैदराबाद)
- ऋषी कालरा (रुरकी)
- राघव गोयल (रुरकी)
- अड्डागड वेंकट शिवराम (हैदराबाद)
- प्रभाव खंडेलवाल (दिल्ली)
- बिक्किना अभिनव चौधरी (हैदराबाद)
- मलय केडिया (दिल्ली)
- नागिरेड्डी बालाजी रेड्डी (हैदराबाद)
- यक्कंती पाणी वेंकट (हैदराबाद)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com