नि:शुल्क माती आणि जागेसाठी आजपासून अर्जप्रक्रिया!

नि:शुल्क माती आणि जागेसाठी आजपासून अर्जप्रक्रिया!

Published on

मुंबई, ता. ६ : शाडू माती आणि पर्यावरणपूरक साहित्यापासून गणेशमूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने पालिकेने शाडूची माती निःशुल्क उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी प्रायोगिक स्तरावर शाडूची माती ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावर देण्यात येणार असून जागाही मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठीच्या ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया महापालिकेच्या संकेतस्थळावर शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ पासून कार्यान्वित होणार आहे. २३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ती कार्यरत राहणार आहे.

निसर्गास हानी पोहचू नये तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने विविध उत्सव आयोजित केले जावेत यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा म्हणून पालिकेच्या वतीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात भाविक आणि मूर्तिकारांना महापालिकेच्या वतीने मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘परिमंडळ २’चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली. केवळ शाडू माती किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच मूर्ती घडवणारे मूर्तिकार संगणकीय प्रणालीद्वारे पालिकेच्या https://portal.mcgm.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

नवरात्रीपर्यंत नि:शुल्क जागा
मूर्तिकारांना महापालिकेतर्फे निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणारी जागा नवरात्रोत्सवापर्यंतच्या कालावधीदरम्यान वापरता येईल. त्यासाठी त्यांना शाडू आणि पर्यावरणपूरक साहित्याने मूर्ती घडवणारे मूर्तिकार आणि साठवणूकदार असल्याबाबतचे हमीपत्र महापालिकेला देणे बंधनकारक आहे. मूर्तिकारांनी त्यांच्या मंडपाबाहेर ‘येथे पर्यावरणपूरक साहित्याने घडवलेल्या मूर्ती उपलब्ध आहे’ अशा आशयाचा तीन बाय पाच फूट एवढ्या आकाराचा फलक लावणे बंधनकारक आहे.

घरगुती मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात बंधनकारक
घरगुती गणेशमूर्तींची उंची चार फुटांपर्यंत असावी. घरगुती मूर्ती शाडू किंवा अन्य पर्यावरणपूरक साहित्यानेच घडवणे बंधनकारक आहे. सर्व घरगुती गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच करणे बंधनकारक आहे. कमी उंचीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्यास प्राधान्य देण्यात यावे, असेही परिमंडळ २ चे उपायुक्त तथा गणेशोत्सवाचे समन्वयक रमाकांत बिरादार यांनी कळवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.