सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या समस्येवर  मानवाधिकार आयोगाचे समन्स

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या समस्येवर मानवाधिकार आयोगाचे समन्स

सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या समस्येवर
मानवाधिकार आयोगाचे समन्स

८ ऑगस्टला आरोग्य विभाग अधिकारी राहणार हजर

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : सरकारी रुग्णालय सेंट जॉर्जच्या समस्यांची दखल राज्य मानवी हक्क आयोगाने घेतली आहे. याबाबत आयोगाने आरोग्य विभागाचे उच्चपदस्थ अधिकारी आणि रुग्णालयाच्या अधीक्षकांना समन्स बजावले आहेत. त्यात ८ ऑगस्टला सुनावणी होणार असून त्या वेळी अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

सेंट जॉर्ज रुग्णालयाबाबत गुरुवारी ‘सकाळ’ने बातमी प्रसिद्ध केली होती. सरकार सेंट जॉर्ज रुग्णालयाला पीजी मेडिकल इन्स्टिट्यूट बनवण्याच्या तयारीत असताना रुग्णालयाचा मुख्य शस्त्रक्रिया कक्ष दोन वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर हे रुग्णांना इतर रुग्णालयात पाठवत असल्याकडे या वृत्तात लक्ष वेधण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत आयोगाने सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, संचालक, आरोग्य व सेवा संचालनालय आणि सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षकांना समन्स पाठवले आहेत.
-----
या प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे
आरोग्य विभागाला आयोगाच्या काही प्रश्नांना सुनावणीदरम्यान उत्तरे द्यावी लागणार आहेत. त्यात शस्त्रक्रिया कक्ष कधीपासून बंद आहे, त्याची कारणे कोणती, रुग्णालयात किती शस्त्रक्रिया कक्ष आहेत, किती कक्ष कार्यरत आहेत आणि रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या कमतरतेबाबतही प्रश्न विचारले आहेत. त्यात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे पॅटर्न काय, रुग्णालयात किती पदे रिक्त आहेत आणि मुख्य शस्त्रक्रिया कक्ष केव्हा तयार होईल, याबाबतही उत्तरे द्यावी लागणार आहेत. मानवाधिकार संरक्षण कायदा, १९९३ च्या कलम १२ अंतर्गत हे समन्स बजावले आहेत.
-------
समस्येवर लवकरच तोडगा
‘सकाळ’ने यासंदर्भात महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले, की रुग्णालयात ज्या काही कमतरता आहेत, त्या दूर केल्या जातील आणि रुग्णांना लवकरच चांगली आरोग्य सेवा दिली जाईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com