राज्या-राज्यामध्ये अवयवदान महोत्सव

राज्या-राज्यामध्ये अवयवदान महोत्सव

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : अवयवदानाबाबत जनजागृती करणे, समज आणि गैरसमज दूर करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना यंदा अवयवदान उत्सव साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या धर्तीवर हा अवयवदान महोत्सव साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी दिल्या आहेत. याबाबतचे पत्रही जारी करण्यात आले आहे.

पहिल्या अवयव प्रत्यारोपणाच्या स्मरणार्थ ३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अवयवदान दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यासोबतच ८ जुलै १९९४ रोजी ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा’ लागू झाल्यामुळे जुलै हा ‘अवयवदान महिना’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. याच धर्तीवर सर्व राज्यांमध्ये अवयवदान उत्सव साजरा करण्याच्या सूचना केंद्र सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत.

निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देऊन अवयव प्रत्यारोपणाची मागणी कमी करणे, ब्रेन स्टेम डेथ, मृत अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाशी संबंधित बेकायदा प्रथांवर नियंत्रण ठेवण्याबद्दल जागरुकता पसरवणे, अवयवदान आणि प्रत्यारोपणाशी संबंधित समज आणि गैरसमज दूर करणे, सरकारी संस्थांमध्ये अवयव दान आणि प्रत्यारोपणाच्या पायाभूत सुविधा वाढवणे, अवयवदानासाठी प्रतिज्ञांची जास्तीत जास्त नोंदणी करणे आदी या उत्सवाची वैशिष्ट्ये असणार आहेत. महोत्सवाअंतर्गत रुग्णालयाद्वारे ब्रेन स्टेम मृत्यू प्रकरणांची ओळख, आवश्यक मनुष्यबळाचे प्रशिक्षण, समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रतिज्ञा समारंभ आयोजित केला जाईल.

मुंबईत अवयवदानामध्ये वाढ
मुंबईत गेल्या पाच आठवड्यांत ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान वाढल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे. जूनपासून आतापर्यंत सात अवयवदान झाले; तर जानेवारी ते मे या कालावधीत अवयवदानाची १७ प्रकरणे नोंदवण्यात आली. गेल्या वर्षी ४७ अवयवदानाची नोंद झाली होती; तर या वर्षी सहा महिन्यांत २४ अवयवदान झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.