अखेर सेंट जॉर्ज रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह सुरू

अखेर सेंट जॉर्ज रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह सुरू

सेंट जॉर्ज रुग्णालयात शस्त्रक्रियागृह लवकरच होणार सुरू
कोविडमुळे बंद होते विभाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : राज्य सरकारच्या सेंट जॉर्ज रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रियागृह विभाग अखेर दोन वर्षांनंतर सुरू होणार आहे. जुलै २०२१ मध्ये शस्‍त्रक्रियागृहात (ओटी) शॉर्टसर्किट झाल्यानंतर मॉड्युलर ओटी बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन वर्षे उलटून गेल्यानंतरही ओटी सुरू झालेली नव्हती. मॉड्युलर ओटीचे काम पूर्ण झाले असून लवकरच येथे शस्त्रक्रिया केल्या जातील, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.
रुग्णालयातील अनेक विभागही बंद होते. ‘सकाळ’ने या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीनंतर शस्त्रक्रियागृहाच्या कामाला वेग आला असून शस्त्रक्रियागृह लवकरच सुरू होणार असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे. अत्याधुनिक शस्त्रक्रियागृहाचे ऑनलाइन उदघाटन वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार आहे.
कोविडमुळे सेंट जॉर्ज रुग्णालयातील अनेक विभाग बंद पडले आहेत. रुग्णांना जे.जे.सह इतर रुग्णालयांत उपचारांसाठी दाखल व्हावे लागत होते. शस्त्रक्रियागृह विभाग बंद असल्याने फक्त किरकोळ शस्त्रक्रिया व्हायच्या. मात्र, आता मुख्य शस्त्रक्रियागृह सुरू झाले आहे. या रुग्णालयाच्या सक्षमीकरणावर भर दिला जाईल आणि मनुष्यबळही वाढवण्यावर भर दिला जाईल, असेही सांगण्यात आले आहे. शस्त्रक्रियागृह विभाग सुरू झाल्याने रुग्णालयाची ५० टक्के समस्या तोडीस निघाली आहे. इतर बंद असलेले विभाग सुरू न झाल्याने रुग्णालय प्रशासनाला आणखी लक्ष द्यावे लागणार आहे. रुग्णालयाला पीजी मेडिकल इन्स्टिट्यूट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे रुग्णालयाचे मुख्य शस्त्रक्रियागृह दोन वर्षांपासून बंद असल्याने रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर्स रुग्णांना इतर रुग्णालयात जाण्याचा सल्‍ला देत होते.
........................................................
रुग्णालयाच्या इतर समस्या
रुग्णालयात केवळ ओटीच नाही तर वरिष्ठ आणि अनुभवी डॉक्टरांचीही कमतरता आहे. रुग्णांना ओपीडीत तपासले जाते, मात्र त्यांना जे.जे. आणि कामा रुग्णालयात दाखल होण्यासाठी पाठवले जाते. पूर्वीप्रमाणे रुग्णसेवा मिळत नसल्याने रुग्ण संख्या घटली आहे. मुख्य शस्त्रक्रियागृह उपलब्ध नसल्यामुळे, स्त्रीरोग आणि प्रसूती शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी, डोळ्याशी संबंधित शस्त्रकिया आणि नेत्र, कान, नाक शस्त्रक्रिया विभागच बंद झाले आहेत. अडीच वर्षे कोविड रुग्णालय असल्याचा ठपका बसल्याने रुग्णही सेंट जॉर्ज रुग्णालयात येण्यास कचरतात. हा ठपका पुसण्यासाठी रुग्णालयातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
......
‘सकाळ’च्या बातमीची दखल
सकाळने सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या सध्याच्या अवस्थेसंदर्भात बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर, या बातमीची दखल मानवाधिकार आयोगाने घेतली होती. त्यासंदर्भात, सुमोटो घेत वैद्यकीय अधिक्षकांसह सर्व वरिष्ठांना चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता शस्त्रक्रियागृह विभाग सुरू झाल्याने अधिकारी वर्गाला ही दिलासा मिळाला आहे.
......
कसे आहे अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह?
नव्याने तयार केलेले अत्याधुनिक शस्त्रक्रियागृह संपूर्ण पणे संसर्ग मुक्त असेल. कारण, मॉड्युलर ओटीत हेपा फिल्टर्स बसवण्यात आले आहेत. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर तत्काळ हवेचे आपोआप शुद्धीकरण होईल. शिवाय, सहा टेबल्स असल्याने एका वेळेस सहा विभागाच्या शस्त्रक्रिया केल्या जातील. यासह फायर प्रूफ कोटिंग केल्याने शॉर्टसर्किट किंवा आग लागण्याच्या घटना टाळण्यास मदत होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com