डासांच्या उत्पत्तीस पालिकाच कारणीभूत

डासांच्या उत्पत्तीस पालिकाच कारणीभूत

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २६ : सुशोभीकरणात भर म्हणून पदपथांच्या कडेला पालिकेकडून फायबरचे कर्व्ह स्टफ लावण्यात आले आहेत. ते तुटून-फूटून डासांच्या अळ्यांचे अड्डे बनले आहेत. महत्त्वाचे म्हणजे पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी काही महिन्यांपूर्वी कारवाईचे आदेश देऊनही खराब कर्व्ह स्टफ अद्याप काढण्यात आलेले नाहीत. यामुळे मुंबईकरांचा जीव धोक्यात घातला जात आहे.
मुंबईतील रस्ते आणि पदपथांच्या बाजूला फायबरचे कर्व्ह स्टफ लावण्यात आले आहेत. पालिकेच्या रस्ते व वाहतूक नियोजन विभागाकडून ते बसवण्यात आल्याचे समजते. पदपथ, चौक आणि रस्त्याच्या कडेला ते बसवण्यात आले आहेत. सध्या मुंबईचे सुशोभीकरण करण्यात येत असल्याने त्यात आणखी भर पडली आहे. काही कर्व्ह स्टफमध्ये लाईट्सदेखील लावण्यात आले आहेत.
मुंबईतील अनेक भागांतील रस्त्यांवरून जाताना अनेक ठिकाणी सफेद, निळे, पिवळ्या रंगाचे कर्व्ह स्टफ नजरेस पडतात. बऱ्याच विभागांत महत्त्वाच्या ठिकाणी रंगबेरंगी कर्व्ह स्टफ लावण्यात आले आहेत. मात्र बऱ्याच ठिकाणी ते फुटले आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा आणि घाण साचली आहे. पाऊस सुरू असल्याने त्यात पाणी साचले आहे. साचलेल्या पाण्यामध्ये डासांच्या अळ्या तयार होत आहेत.
पालिकेच्या कीटकनाशक खात्याला याबाबत अवगत केले असता त्यांनी याची गांभीर्याने दखल घेणार असल्याचे सांगितले. फुटलेल्या कर्व्ह स्टफमध्ये साचत असलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरियाच्या अळ्या होण्याचा धोका असल्याचे त्यांनी मान्य केले. खास करून बसस्थानकांवर असणाऱ्या कर्व्ह स्टफमध्ये पैदा होणाऱ्या मच्छरांचा मोठा धोका बसची वाट बघत उभ्या राहणाऱ्या प्रवाशांना आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन त्याची पाहणी करण्याचे निर्देश या विभागाने कर्मचाऱ्यांना दिले आहेत. पाणी साचलेले कर्व्ह स्टफ ताबडतोब काढून टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
...
काही ठिकाणचे स्टफ काढले
‘सकाळ’ने महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी कर्व्ह स्टफ काढून टाकण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले होते. त्यानंतर काही ठिकाणचे स्टफ काढून टाकण्यात आले. यानंतर मात्र ही कारवाई थंडावली. त्यामुळे ही समस्या ‘जैसे थे’च आहे. पालिका प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचे यातून दिसते.
...
फुटलेल्या कर्व्ह स्टफमध्ये डासांच्या अळ्या होण्याची भीती आहे. सर्व स्टफ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात येतील. पालिकेच्या संबंधित विभागाला पत्र पाठवून या समस्येबाबत अवगत केले जाईल.
- चेतन चौबळ, प्रमुख, कीटकनाशक खाते
.......

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com