‘फायर रोबोट’ने अग्निसुरक्षेला बळकटी!

‘फायर रोबोट’ने अग्निसुरक्षेला बळकटी!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ३१ : मुंबई अग्निशमन दलाच्या ताफ्यात आणखी दोन फायर रोबोट दाखल होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले हे दोन्ही फायर रोबोट जर्मनीतून खरेदी केले जाणार आहेत. यावर तब्बल सात कोटी ४७ लाख ३४ हजार ९२० रुपये खर्च केले जाणार असून, या रोबोटचा हमी कालावधी केवळ २४ महिने असेल. अग्निशमन दलाकडे असणाऱ्या फायर रोबोटच्या उपयोगीतेवर प्रश्नचिन्ह असतानाच आणखी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी कशाला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मुंबईत उंच इमारती, मल्टिप्लेक्स यांची बांधणी मोठ्या प्रमाणात होत आहे. या ठिकाणी बहुमजली वाहनतळेही बांधली जातात. त्यामुळे आगीची दुर्घटना घडल्यास अग्निशमन दलाला तेथे बचावकार्य करणे आव्हानात्मक होते. मुंबईवर झालेले दहशतवादी हल्ले लक्षात घेता अशा परिस्थितीमध्ये अग्निशन दलाच्या जवानांचा जीव धोक्यात घालावा लागतो. मुंबईत पेट्रोकेमिकल कारखाने किंवा अणुऊर्जा संशोधन केंद्र या ठिकाणीही आगीच्या दुर्घटना घडल्यास बचावकार्य करणे धोकादायक होते. अशा परिस्थितीत सुरक्षित अंतरावरून रिमोट कंट्रोलच्या सहाय्याने फायर रोबोटचा वापर केला जातो.

मुंबई अग्निशमन दलाच्या भायखळा केंद्रात सद्यस्थितीत एक फायर रोबोट उपलब्ध असून त्याचा आवश्यकतेप्रमाणे उपयोग केला जातो; परंतु शहराची झपाट्याने होणारी वाढ, वाहतूक वर्दळ यामुळे उपनगरांमध्ये एखादी दुर्घटना घडल्यास फायर रोबो तिथपर्यंत नेण्यास उशीर होतो. परिणामी जीवितहानी वाढण्याची शक्यता अधिक वाढते. याकरिता मुंबई पूर्व उपनगरांसाठी दोन फायर फायटिंग रोबोट वाहनासह खरेदी करण्यात येत आहेत.

सेवा परिक्षण कंत्राटासह खरेदी
फायर रोबोट उच्च तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याची दैनंदिन दुरुस्ती व परिरक्षण करणे गरजेचे आहे. त्यासाठी हे रोबोट पाच वर्षांच्या सर्वंकष सेवा परिक्षण कंत्राटासह खरेदी करण्याचे प्रस्तावित आहे. पालिकेच्या सुधारित निविदेस मे. रेस्क्यु टेक्नोलॉजिस, मे. मित्रास टेक्नोप्रा.लि., मे. न्यु इंजिनियरींग कॉर्पोरेशन, मे. श्री ललिता आदींनी प्रतिसाद दिला असून, त्यातील मे. श्री ललिता यांना काम देण्यात आले आहे.

उपयोग कुठे?
अतिधोकादायक परिस्थितीत जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती, तळघर, रासायनिक कारखाने, मेट्रो रेल्वे किंवा कोस्टल रोड बोगदे आदी ठिकाणी लागलेल्या आग विझविण्याकरिता या फायर रोबोटचा उपयोग होणार आहे. यामध्ये कॅमेरासह रिमोट कंट्रोल नियंत्रण प्रणाली असल्यामुळे प्रत्यक्ष आगीच्या ठिकाणापासून लांब उभे राहून बचावकार्य करणे रोबोटला शक्य होणार आहे.

दोन फायर रोबोटवर साडेसात कोटी रुपये खर्च करायची गरज नव्हती. महापालिकेत प्रशासकांची मनमानी सुरू आहे. जनतेच्या पैशांची उधळपट्टी होत आहे. प्रशासनाला एक दिवस याचे उत्तर द्यावे लागेल.
- रवी राजा, माजी विरोधी पक्षनेता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com