आयआयटी मुंबईच्या दिक्षांत सोहळ्यात ४२० जणांना पीएचडी तर अनेकांना सुवर्ण आणि रौप्यपदके

आयआयटी मुंबईच्या दिक्षांत सोहळ्यात ४२० जणांना पीएचडी तर अनेकांना सुवर्ण आणि रौप्यपदके

आयआयटीचे ४२० विद्यार्थी पीएचडीधारक
दीक्षांत सोहळ्यात पदकांचे वितरण
मुंबई, ता. २१ : आयआयटी मुंबईच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाचा आणि ६१ वा दीक्षांत सोहळा नुकताच पार पडला. यात एकूण ४२० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. यासोबतच २ हजार ८०० विद्यार्थ्यांना ३ हजार ७८ पदव्या प्रदान करण्यात आल्या. त्यात सुवर्णपदकांसह विविध रौप्य पदकांचा समावेश होता. आयआयटी मुंबईने ६१ व्या दीक्षांत समारंभाच्या निमित्ताने डिपार्टमेंट डिग्री डिस्ट्रिब्युशन फंक्शन (डीडीडीएफ) या अंतर्गत सलग दोन दिवस पदवी प्रदान करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.
प्रदान करण्यात आलेल्या पदव्यांमध्ये ८१६ बीटेक, ३७२ बीटेक आणि एमटेक अशी दुहेरी पदवी, तसेच ६८ विद्यार्थ्यांना इंटरडिसिप्लिनरी ड्युअल डिग्री प्रदान करण्यात आली. त्यात बीटेक, एमटेक आणि एमएस्सी या पदव्यांचा समावेश होता. तसेच ६१ विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या बीएस, १८ विद्यार्थ्यांना ड्युअल डिग्रीतील बीएस-एमएस्सी, २५ विद्यार्थ्यांना बीडीईसए, तसेच २० विद्यार्थ्यांना ड्युअल डिग्रीतील बीडीईएस-एमडीईस अशा पदव्या प्रदान करण्यात आल्या. तीन वर्षांच्या बीएसची पदवी ही ३० जणांना प्रदान करण्यात आली.

यांचे विशेष यश
संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील बी.टेकचे विद्यार्थी हर्षित गुप्ता यांना अत्यंत मानाचे असे भारताचे ‘राष्ट्रपती सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. रसायनशास्त्र विभागातील विज्ञान शाखेचा पदवीधर विद्यार्थी अनिश शिवमणी याला संस्थेचे सुवर्णपदक आणि केमिकल अभियांत्रिकी विभागातील बी.टेक विद्यार्थी अक्षत शिरीष झाल्टे याला डॉ. शंकरदयाळ शर्मा सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. याशिवाय, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेण्यासाठी इतर सुवर्ण आणि रौप्य पदके प्रदान करण्यात आली.

या पदव्यांचे वितरण
आयआयटी मुंबईतील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या एमटेकची पदवी ही ६४३ जणांना, तर संशोधनानुसार ३३ जणांना एमएस, ८ जणांना ड्युअल डिग्री ही एमटेक/एमएससी+एमएस संशोधनाद्वारे, तसेच ७३ विद्यार्थ्यांना एमडीईएस आणि १२ जणांना एमफिलची पदवी प्रदान करण्यात आली.
आयआयटी मुंबईत २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात ४२० विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यात एमटेक, एमफिल+पीएचडीची ड्युअल डिग्री, एमएससी+पीएचडीची ड्युअल डिग्री आणि मोनाश युनिव्हर्सिटी, एनटीयू आणि एनयूएससह संयुक्त पीएचडीसह प्रदान करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com