मुंबईत अद्याप उमेदवार अस्पष्ट

मुंबईत अद्याप उमेदवार अस्पष्ट

मुंबईत अद्याप उमेदवार अनिश्चित
छुपा प्रचार सुरू; पक्षांतर्गत बैठकांवर जोर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ ः मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात नेमके उमेदवार कोण असतील, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही जागांवरील वाद आणि राजकीय रणनीतीचा भाग म्हणून अनेक पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. असे असले तरी अनेक उमेदवारांनी आतून, तर काहींनी छुपा प्रचार सुरू केला आहे. पक्षाकडून सर्व उमेदवार घोषित करण्याची वाट सर्वच पक्षांचे कार्यकर्ते बघत आहेत. त्यानंतर मात्र प्रचाराला जोर चढणार आहे.
मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आपले उमेदवार बऱ्यापैकी घोषित केले आहेत. असे असले तरी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये अजूनही काही जागांवरील वाद कायम आहे. मुंबई दक्षिण मध्यमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांनी पक्षांतर्गत बैठकांवर जोर मारला आहे. या बैठकांमध्ये त्यांनी शिवसैनिकांमध्ये जोश भरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तिथेदेखील काँग्रेसची चर्चा सुरू आहे. यामुळे येथेही उघड प्रचार सुरू झालेला नाही. मात्र अमोल कीर्तिकर यांनी घरोघरी भेटीगाठीवर भर दिला आहे.
मुलगा असल्याने आपण निवडणूक लढणार नसल्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. मात्र असे असले तरी भाजप आणि शिवसेनेने अमोल कीर्तिकर यांना शह देण्यासाठी मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.
भाजप आणि शिवसेना (शिंदे) यांच्यातील जागावाटपदेखील पूर्ण झालेले नाही. मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य येथे देखील भाजपने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. काही उमेदवार गुडघ्‍याला बाशिंग बांधून बसले असले तरी पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसल्याने संभ्रम कायम आहे. अशा ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आतून प्रचार सुरू केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावाने मौखिक प्रचार सुरू असून उमेदवार कुणीही असो, मात्र मत हे मोदींसाठीच असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे.
.......................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com